उस्मानाबाद : आरोग्य यंत्रणा अपुरी ठरण्याची शक्यता बळावत चालल्याने गंभीर नसलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा सरधोपट मार्ग आरोग्य विभाग अवलंबत आहे. मात्र, त्यांची विचारपूस वगळता कसलेही नियंत्रण नसल्याने संसर्ग वाढीला चालनाच मिळत आहे. अगदी या गृह विलगीकरणातील रुग्णांचा कचराही नियमित घंटागाडीतूनच नेला जात असल्याने धोका वाढला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. आजघडीला साडेचार हजारांवर ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, यंत्रणा अपुरी ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक रुग्णांना होम आयसोलेटेड केले गेले आहे. या रुग्णांची प्रत्येक दोन दिवसांनी फोनवरून विचारपूस केली जाते. प्रकृती चांगली आहे का, काही अडचणी आहेत का, असे आधार देणारे शब्द रुग्णांच्या कानी पडतात. आशा कार्यकर्ती किंवा अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष घरी जाऊन विचारपूस होत आहे. असे असले तरी या रुग्णांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पुरेशी ठरत नाही. दरम्यान, या रुग्णांच्या कच-याबाबत तर धक्कादायक बाब समोर आली आहे. उस्मानाबाद शहरात असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र घंटा गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सेंटरमधील कचरा नियमित एकत्र करून सुरक्षित स्थळी त्याची विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, त्यांचा कचरा नियमित नागरिकांच्या कच-यासोबतच गल्लीत येणा-या नियमित घंटागाडीतून कचरा डेपोवर जात आहे. यामुळे स्वच्छता कर्मचा-यांसह कचरा टाकण्यासाठी येणा-या नागरिकांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. ही अवस्था केवळ उस्मानाबाद शहरातच आहे, असे नाही तर अन्य शहरांतही वेगळी परिस्थिती नाही.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वस्तू (लाकूड, कागद वगळून) या संसर्ग प्रसारक ठरू शकतात, असा दावा आरोग्य विभागाचा आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना मिळणारे जेवण हे वापर झाल्यानंतर टाकून देता येईल, अशा पॅकिंगमध्ये देण्यात येते. त्याचा कचरा निर्माण होतो.
ज्यांच्या घरी सर्वच बाधित आहेत किंवा देखभालीसाठी अन्य कोणी नाही, असे रुग्ण कचरा, अन्नपदार्थाचे पॅकेट घंटागाडी येण्याच्या वेळी घराबाहेर आणून ठेवतात.
घंटागाडीवरील कर्मचारी जीव धोक्यात घालून या कच-याचे वहन करतात. अनेकदा त्यांना हा कचरा बाधितांचा आहे, हे माहितीही नसते.
३०० : कचरा एकत्र करणारे कर्मचारी
३० टन ओला कचरा
२ टन सुका कचरा
कोट...
होम आयसोलेटेड रुग्णांशी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित फोन केले जात आहेत. त्यांच्या प्रकृती, अडचणींबाबत विचारपूस केली जाते. आता कच-याच्या बाबतीतही लागलीच व्यवस्था लावण्यात येईल. यासाठी ४ स्वतंत्र घंटागाड्या राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात येईल. आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद