उस्मानाबाद : चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हिस्ट्रीशीटर्सची जिल्हा पोलीस दलाकडून गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत अचानक झडती घेण्यात आली. ते सध्या काय करतात, वर्तणूक कशी आहे, याची चाचपणी या कोम्बिंग ऑपरेशनमधून घेण्यात आली. जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यातही चोरी, दरोडा असे मालासंबंधी व इतर गुन्हे केलेले अनेक आरोपी व गुन्हेगार उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यातील अनेक आरोपी हे उस्मानाबाद तसेच इतर जिल्ह्यांना तपासकामी हवे आहेत. परंतु, त्यांचा निश्चित ठावठिकाणा समजून येत नसल्याने त्यांना पकडणे जिकिरीचे होऊन बसले आहे. अशा आरोपींसोबतच इतर संशयित व्यक्तींची हिस्ट्रीशीट पोलीस दलाने उघडली आहे. या आरोपींचा सध्याचा व्यवसाय, वर्तणूक याची चाचपणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेनुसार गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्हाभरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये आरोपींच्या ५२ घरे-वस्त्यांना भेटी देण्यात आल्या. शिवाय, लॉजेस, १० बसस्थानके व रेल्वे स्थानक, ४५ ढाबे, ४४ पेट्रोलियम विक्री केंद्रे, ३४ बँका, ५३ एटीएम केंद्रांना अचानक भेटी देऊन तसेच महामार्गावरील संशयित वाहनांची सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. तसेच या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ३० हिस्ट्रीशीटर व्यक्तींना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या सध्याच्या वर्तनाची शहानिशा करण्यात आली.
'ते' सध्या काय करतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST