उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, याबाबतीत तालुका क्रीडा संकुल समितीने सविस्तर प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविण्याबाबत सूचना क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी दिल्या.
उस्मानाबाद येथील क्रीडा संकुलाच्या अनुषंगाने मंगळवारी क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्यासह एमआयडीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन, त्यांच्या गुणांना वाव देण्याच्या हेतूने, तसेच गुणवंत व दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने तालुका क्रीडा संकुल अतिशय महत्त्वाचे आहे. सर्व सोईसुविधायुक्त सुसज्ज तालुका क्रीडा संकुल शहराजवळ उभारले जावे, अशी मागील अनेक वर्षांपासूनची तालुक्यातील खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा संघटक व क्रीडाप्रेमींची मागणी आहे. या दृष्टीने उस्मानाबाद तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार कैलास पाटील यांनी सुसज्ज तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी शहराजवळ एमआयडीसीमधील १६ एकर जागा मिळण्याबाबत राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. याबाबतीत आमदार पाटील यांच्या नियमित पाठपुरावा व बैठक घेण्याच्या मागणीनुसार मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आगामी उद्योग विभागाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदरील प्रस्ताव ठेवण्याच्या दृष्टीने तालुका क्रीडा संकुल समितीने प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी, तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
कोट...
मागील अनेक वर्षांपासून जागेमुळे प्रलंबित असलेल्या तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न तत्काळ निकाली लागण्याच्या दृष्टीने तालुका क्रीडा संकुल समितीचे प्रयत्न अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सुसज्ज व सर्वांसाठी सोईस्कर संकुल असण्याच्या दृष्टीने शहराजवळ क्रीडा संकुल उभे राहणे महत्त्वाचे असून, तालुक्यातील खेळाडूंसाठी हे संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर.
क्रीडा संकुलाविषयी तालुक्यातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक, क्रीडा संघटना व क्रीडाप्रेमींनी अनेक वेळा भेट घेऊन हा प्रश्न निकाली लावण्याची मागणी केलेली आहे. याबाबतीत स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन मागणी निकाली लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची होती. लवकरात लवकर तालुका क्रीडा संकुल उभारून ते खुले होण्याच्या दृष्टीने स्वतः पाठपुरावा करणार आहे.
-आ.कैलास पाटील, अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती