२८२ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. या वाहनचालकांकडून ६३ हजार ६०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
रस्त्यावर वाहने केली उभी, दोघांविरुध्द गुन्हे दाखल
उस्मानाबाद : रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. बुधवारी नळदुर्ग येथील शहामोहम्मद कुरेशी, सुभाष पवार या दोघांनी आपआपल्या ताब्यातील वाहने अनुक्रमे क्र. एमएच. २५ एम ३३८ व वाहन क्र. एमएच २५ एन १०२३ हे नळदुर्ग बसस्थानकासमोर ठिकाणी उभी केल्याचे नळदुर्ग पोलिसांस आढळून आले. यावरून उपरोक्त दोघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आली.
जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुध्द गुन्हा दाखल
उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील जुगार अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने २७ जानेवारी रोजी छापा टाकला. यात तेर येथील शंकर पवार यांच्याजवळ कल्याण मटका साहित्य व १ हजार ६० रुपये आढळून आले. पोलिसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करून संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला.
वरंवटी शिवारातून विद्युत पंप चोरीस
उस्मानाबाद : शेत विहिरीतील विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला, ही घटना तालुक्यातील वरवंटी येथे २७ जानेवारी रोजी घडली.
वरवंटी येथे अजित नायगावकर यांचे शेत आहे. या शेत विहिरीतील ३ अश्वशक्ती क्षमतेचा सौर विद्युत पंप अज्ञात चोरट्याने २६ व २७ जानेवारीच्या रात्री चोरून नेला, चोरी झाल्याचे समजताच नायगावकर यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला.