हॉटेल-दुकानात गर्दी, ५ जणांवर गुन्हे
उस्मानाबाद : येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल बांगर बंधू व मुंढे बंधू येथे गुरुवारी सायंकाळी नियमांचे पालन न करता ग्राहकांची गर्दी जमविण्यात आली होती. या प्रकरणी चालक भगवान बांगर व गोविंद मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे परंडा येथेही आकिब डोंगरे, शफी मोमीन, सारंग खंडाळे यांनी दुकानात गर्दी जमवली. यावरून या तिघांवरही परंडा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुटखा बाळगल्याने सरोळ्यात कारवाई
उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा येथील मियाँसाहेब मिटु सय्यद फकीर याने प्रतिबंधित गुटखा बाळगल्याची माहिती प्रशासनास मिळाली होती. या अनुषंगाने गुरुवारी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता १० हजार ६४० रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची आत्महत्या, पतीसह दोघांवर गुन्हा
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कोराळ येथील सुकुमार काशिनाथ जंगाले यांचा सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणावरून छळ केल्याने त्यांनी घरातच गळफास घेऊन काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कानेगाव भारतबाई भीमराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत महिलेचा पती काशिनाथ जंगाले, सासू विमल जंगाले व जाऊ जनाबाई यांच्याविरुद्ध गुरुवारी मुरुम पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या वादातून दोघांना काठीने केली मारहाण
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथील दोघा भावांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कृष्णा व आशिष महादेव कांबळे हे दोघे भाऊ गावातील चौकात थांबलेले असताना जुना वाद उकरून काढत आरोपी भाऊबंद माणिक, संतोष व मसाजी यांनी त्या दोघांना काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उमरगा ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.