वाशी - भारतीय स्टेट बँकेच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्य व्यापारी वर्गासह इतर खातेदार अडचणीत आले आहेत. चालू अथवा कॅश क्रेडिट यापैकी एकच खाते चालू ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. या नियमाचा शहरातील जवळपास ५० ते ६० माेठ्या व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. या नियमाला आता विराेध हाेऊ लागला आहे.
वाशी येथे एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या बँकेतूनच व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे व्यवहार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून कॅश क्रेडिट व चालू खाते यापैकी चालू खात्यास बॅँकेने हाेल्ड लावून व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. अशा स्वरूपाची कार्यवाही अनुसरताना बॅँकेकडून कुठल्याही स्वरूपाची पूर्वकल्पना दिली गेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांनी कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी बँकेत चकरा मारल्यानंतर ‘‘प्रथम आपण बँकेत व्यवहार चालू करा, आपला व्यवहार पाहून आपल्याला कॅश क्रेडिट मंजूर करता येईल’’, असे सांगण्यात आले. यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपापल्या व्यवसायाच्या नावे बँकेत चालू खाते उघडले. त्यानंतर ज्यांचे व्यवहार चांगले आहेत, अशांना कॅश क्रेडिट मंजूर केले. यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे बँकेने चालू खात्यास होल्ड लावल्यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे.
कोरोनाच्या महामारीतून आता कुठे व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले असताना, व्यापाऱ्यांच्या खात्यास होल्ड लावल्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. बँकेच्या वरिष्ठ प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या चालू खात्यास लावलेला होल्ड काढावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
काेट...
व्यापारी वर्गाने कोणतेही एकच खाते वापरावे. दाेन पैकी एका खात्यात हाेल्ड लावण्यात आला आहे. अशा खातेदारांची संख्या ५० ते ६० एवढी आहे. बॅँकेत कॅश डिपाॅझिट व पासबुक प्रिंटर लवकरच बसणार असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यास मदत हाेणार आहे.
-अमित ओव्हाळ, शाखाधिकारी.
रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार सीसी, करंट, ओडी यापैकी एक खाते असावे असे जरी आदेशित असले तरी बँकेच्या प्रशासनाने व्यापाऱ्यांना खात्यास होल्ड लावणे बरोबर नाही, असे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या महामारीतून सध्या वाटचाल चालू आहे. त्यातच सध्या मार्च महिना चालू असल्यामुळे व्यापाऱ्यांची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी हतबल झाले आहेत.
ॲड. सचिन पवार, सचिव, व्यापारी संघटना