मुरूम : येथील ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले.
सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. त्याला आता या लसीने थोडे समाधान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मुरूम व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी कोशिल्ड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांनी केले आहे. मुरूम रुग्णालयातील कोशिल्ड लसीकरण उद्घाटनावेळी ज्येष्ठ नागरिक बाबुराव धुमुरे व मल्लिनाथ पिचे यांनी लसीचा लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालयात सध्या २०० कोशिल्ड लसी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी डॉ. बाबरे यांनी दिली. यावेळी नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.