वाशी : कडकनाथवाडी गेल्या चार दिवसांपासून नऊ म्हशींचा मृत्यू झाला असून, घटसर्फ या रोगामुळे झाला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष तांबडे यांनी सांगितले. दरम्यान, पशुधन विभागाच्यावतीने मागील दोन दिवसांपासून येथे पशुधनांना लसीकरण केले जात असून, आतापर्यंत २९६ जनावरांना हे लसीकरण करण्यात आले. राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी लम्पीचे संकट शेतकऱ्यांच्या पशुधनावर होते. त्यापाठोपाठ आता कुक्कटपालन करणाऱ्या शेतकऱ्यावर बर्ड फ्लूचे संकट ओढवलेले असतानाच वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे मागील चार दिवसांपासून जनावरांच्या तोंडाला लाळ येणे व पोट फुगून जागीच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये काही वासरेही मयत झाली आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत वाशी येथील पशुधन विकास अधिकारी आल्लमवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कडकनाथवाडी हा परिसर डोंगराळ असून, पशुपालक शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी या डोंगराळ परिसरामध्ये मोकाट सोडतात. कदाचित या जनावरांनी डोंगरातील अज्ञात विषारी वनस्पती चारा खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होत असावी. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही दिवस आपले पशुधन डोंगरात मोकाट सोडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. तेरखेडा येथील प्रभारी पशुधन विकास अधिकारी तांबडे हे या भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर लक्ष ठेवून आहेत.
कडकनाथवाडीत २९६ पशुधनांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST