महिलांच्या तक्रारी स्थानिक पोलिसात नोंदवणार
उमरगा : महिला आणि बालकांच्या कौटुंबिक तक्रारींचे निवाडे करण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्यात मागील २३ वर्षांपासून सुरू असलेले भरोसा केंद्र अर्थात महिला तक्रार निवारण केंद्र १५ दिवसापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे महिलांच्या अत्याचारावरील तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यातच घेतल्या जाणार आहेत. यासाठी विशेष महिला पोलीस पथक गठीत करण्यात आले असून, या पथकातील एक महिला पोलीस प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहणार आहे.
येथील महिला तक्रार निवारण केंद्रात महिलावर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या तक्रारी या केंद्रात नोंदवल्या जात होत्या आणि या तक्रारीच्याआधारे केंद्राच्या समितीकडून दोन्ही कुटुंबातील वाद-विवादबाबत चर्चा करून प्रकरण सामोपचाराने मिटवले जात होते. विशेष म्हणजे गेल्या २३ वर्षात जवळपास चार हजारपेक्षा जास्तीच्या कौटुंबिक वाद येथील केंद्रांतर्गत मिटवण्यात आल्याने त्यांचे संसार पुन्हा फुलल्याची उदाहरणे आहेत. अत्याचार पीडित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबांना तक्रार निवारण केंद्राबाबत अधिकच ‘भरोसा’ असल्यामुळे तालुक्यातील असंख्य पीडित महिला पोलीस ठाण्यात दाद मिळत नसल्यामुळे आपल्या न्यायासाठी येथील भरोसा असलेल्या तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेत होत्या. मात्र, मागील १५ दिवसापासून या केंद्रात तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याने तक्रारदार महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, पीडित महिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यातच तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. येथे महिला आणि बालकांवरील गुन्ह्याचे प्रकरण हाताळण्यासाठी जिल्ह्यात विशेष महिला पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसात आलेल्या तक्रारींचे अहवाल महिला प्रतिनिधी पथकाच्या प्रमुखासमोर सादर करण्याच्या सूचना आहेत. सध्या सहायक पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे महिलांवरील अत्याचार प्रकरणी तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. भरोसा केंद्र नेमके का बंद करण्यात आले, हे जाणून घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कोट.......
वेगवेगळ्या कारणाने होत असलेल्या कौटुंबिक वादाला पोलीस केंद्रात कार्यरत असणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्रामुळे (भरोसा केंद्र) अनेकांचे तुटणारे संसार परत उभे राहिले. या केंद्रामुळे पीडित महीलांना मोठा आधार होता. त्यामुळे प्रशासनाने परत या केंद्राची तालुका स्तरावर सुरूवात करावी.
- ॲड. फरहिनबानो पटेल