उस्मानाबाद : डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांचा सहन करावा लागत आहे. दरवर्षी दर वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून शेतजमिनीची मशागत ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. रबी हंगामात हरभरा, गहू, आदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मशागतीची गरज असते. दरम्यान, डिझेलचे दर गगनाला भिडल्याने आर्थिक संकटात सामोरेे जावे लागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने परिणामी ट्रॅक्टर मालकांना मशागतीचे दर वाढविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सध्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकरी २०० रुपयांनी दर वाढविल्याचे चित्र आहे. गतवर्षी नांगरणी प्रती एकर १०० रुपये होती. यंदा १२०० रुपये घेतले जात आहेत. तसेच ग्रामीण भागात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना जादा मजुरी द्यावी लागत असल्याने चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुसरीकडे ट्रॅक्टरचालकांशी चर्चा केली असता डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढविल्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात उत्पादन अल्प झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबीची मशागत करण्यासाठी लागली आहे.
पॉईंटर...
मशागतीसाठी एकरी पाच हजारांपेक्षाही जास्त खर्च
डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टरचालकांनीही दरात वाढ केली आहे. सुरुवातीपासून नांगरणी, मोगडा, वखरणी खासाठी जवळपास पाच हजार रुपये खर्च लागत आहे.
जमिनीत वापरण्यात येणाऱ्या खत, औषधांच्या वापराबरोबर यंत्राने केली जाणारी मशागतही घातक ठरत आहे. या यंत्राच्या वापरामुळे जमिनीचा पाेत ढासळत चालल्याचे बोलले जात आहे.
वाढत्या यंत्राच्या वापरामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जमिनीसाठी शेणखत, मलमूत्रापासून मिळणारे घटक बंद झाले आहेत. त्याचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे.
कोट...
शेतीमालास भाव मिळेना झाला आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढल्याने वाढल्याने ट्रॅक्टरमालकांनी मशागतीचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांंच्या खिशाला कात्री बसत आहे.
नीरज पाटील
शेतकरी, येणेगूर
यंदा सततचा पाऊस व किडीच्या प्रादुर्भावाने खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. रब्बी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. त्यामध्येच आता ट्रॅक्टरमालकाने मशागतीचे दर वाढविले आहे. पेरणीचे दर वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतीमालाचे भाव वाढवावेत.
पृथ्वीराज पाटील, शेतकरी
शेतीच्या मशागतीसंबंधित सर्वच कामे ट्रॅक्टरद्वारे करण्याची यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध आहे. नांगर, मोगडा, पेरणीयंत्र यांसह कल्टीवेटर, रोटायंत्र महागडे असून त्याचा देखभाल आणि मजुरीचा खर्च गृहीत धरून मशागतीचा दर आकारला जातो. त्यात आता डिझेलचा दर ८३ रुपये झाला आहे. त्यामुळे मशागतीचे दर वाढविण्यात आले.
बालाजी रोहिले, ट्रॅक्टरमालक