उस्मानाबाद : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चाेरीच्या घटनेत अज्ञातांनी दाेन म्हशी, एलइडी टीव्ही, दुचाकीसह अन्य ऐवज लंपास केला. या प्रकरणी संबंधित पाेलीस ठाण्यात ३० जुलैला गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. चाेरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरगा शहरातील मानेनगर भागातील राजकुमार वायबसे यांनी २८ ते २९ जुलै या कालावधीत आपली दुचाकी घरासमाेर उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने ही दुचाकी लंपास केली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर सर्वत्र शाेध घेतला. परंतु, दुचाकी मिळून आली नाही. तसेच लातूर येथील काशिनाथ विलास सूर्यवंशी यांनी आपली दुचाकी उमरगा चाैरस्ता येथे उभी केली हाेती. अज्ञाताने ही दुचाकी २९ जुलै राेजी लंपास केली. या प्रकरणी उमरगा ठाण्यात दाेन स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिसरी घटना उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी येथे घडली. येथील जिल्हा परिषद शाळेच्या खाेलीच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून अज्ञाताने आतील एलइडी टीव्ही चाेरून नेला. ही घटना समाेर आल्यानंतर मुख्याध्यापक महेश अनपट यांनी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध ३० जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाैकट...
दाेन म्हशी, रेडकूही पळविले...
उस्मानाबाद येथील प्रवीण माळी यांच्या शेतातील गाेठ्यातून दाेन म्हशी, तसेच एक रेडकू अज्ञात चाेरट्यांनी लंपास केले. ही घटना २९ ते ३० जुलै या कालावधीत घडली. चाेरीची घटना समाेर येताच माळी यांनी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
१२० मीटर विद्युत तार लंपास
उस्मानाबाद शहरातील वैराग राेड शिवारातील विद्युत महावितरण कंपनीच्या खांबावरील सुमारे १२० मीटर ॲल्युमिनियमची तार २६ ते २७ जुलै या कालावधीत अज्ञाताने लंपास केली. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर तंत्रज्ञ राजाराम पडवळ यांनी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.