: शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील गुंजोटी मोडलगत असलेल्या राजधानी पेट्रोल पंपासमोर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात ३० वर्षीय युवक ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील चंडकाळ येथील माधव गणपती कांबळे (वय ३०) हा दुचाकीवरून (क्र. एमएच १३/ एवाय ७८८८) नंदगाव (ता. तुळजापूर) येथील नातेवाइकांच्या लग्नासाठी गेला होता. विवाह सोहळा आटोपून राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे परतत असताना शहरातील गुंजोटीमोड समोरील राजधानी पेट्रोल पंपातून पाठीमागे येत असलेल्या टेम्पोची (क्र. एम एच २०/ बी टी ३३३७) दुचाकीला धडक बसली. यात माधव कांबळे गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत टेम्पो ताब्यात घेतला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.