तालुक्यातील डोंजा, आलेश्वर, बंगाळवाडी, पारेवाडी ही गावे सीना कोळेगाव धरण लाभपट्ट्यात येतात. गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने सीना-कोळेगाव पूर्ण क्षमतेने भरले होते. परिणामी या धरण लाभ पट्ट्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. संपूर्ण लाभ पट्ट्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. चार गावे, वाड्या, वस्ती व संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा डोंजा येथील उपकेंद्रातून केला जातो. ओलित क्षेत्र जास्त असल्याने डोंजा उपकेंद्रावर प्रमाणापेक्षा जास्त लोड वाढल्याने ट्रान्स्फॉर्मर जळण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अतिरिक्त भारामुळे कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडत आहेत. विद्युत ट्रान्स्फाॅर्मर वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. त्यामुळे उपकेंद्रांची विद्युत क्षमता वाढविण्यासाठी तत्काळ येथे सक्षम ट्रान्स्फाॅर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून वारंवार होत आहे.
पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीला वांरवार सूचना व मागणी करूनही सदरील समस्या सुटत नसल्याने आ. डॉ. तानाजी सावंत यांनी सदरील उपकेंद्राची विद्युत क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त ५ एमव्हीए पाॅवर ट्रान्स्फॉर्मरला तत्काळ मंजुरी देऊन डोंजा उपकेंदात बसविण्याची मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.