उस्मानाबाद : लाखो भाविकांची वर्दळ असलेल्या श्री क्षेत्र तुळजापुराला केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेत समाविष्ट करून विकास करावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासाठी तातडीने बैठक घेऊन प्रस्ताव दाखल करण्याबाबतही त्यांनी अवगत केले आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासकरिता केंद्र शासनाने प्रशाद नावाची मिशन मोडवरील तीर्थक्षेत्र विकासासाठीची योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पर्यटक वाढीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राबाबत जागरूकता वाढविणे, कौशल्य विकास, पर्यटन वाढविण्यासाठी क्षमता निर्माण करणे, पर्यटकांना मूल्यवर्धित सेवा पुरविणे, पर्यटन स्थळांमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे व एकात्मिक विकास आराखड्याच्या माध्यमातून परिसर विकसित करणे या बाबी अंतर्भूत केल्या आहेत. या योजनेला संपूर्णत: केंद्र शासनाचे अर्थसहाय्य आहे. योजनेत स्थळ समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारच्या शिफारशीसह विनंती आवश्यक आहे. दरम्यान, श्री क्षेत्र तुळजापूरचा या योजनेमध्ये समावेश केल्यास या भागात मोठी गुंतवणूक वाढेल व औद्योगिकीकरणाचा अभाव असलेल्या या जिल्ह्यात मोठी आर्थिक क्रांती घडू शकेल. तुळजापूर हे देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक येत असतात. महाराष्ट्राचा हा समृद्ध अध्यात्मिक वारसा आणखी बळकट करण्यासाठी तुळजापूरचा समावेश प्रशाद योजनेमध्ये करावा लागेल. यासाठी केंद्र सरकारला शिफारशीसह विनंती करणेबाबत सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची शिवसेना व विशेषत: ठाकरे कुटुंबीयांची श्रध्दा, प्रेम, सर्वश्रुत आहे. त्यामुळे या विषयात आदित्य ठाकरे हे व्यक्तिशः लक्ष घालतील, अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.