उमरगा : शेती करत असताना शेतकऱ्यांनी सेवाभाव व व्यवसायिकता जपावी, असे आवाहन करीत शेतकऱ्यांचे गट तयार करून एकत्रित शेती केल्यास शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असे प्रतिपादन पुणे येथील शाश्वत कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय ठुबे यांनी व्यक्त केले.
शांतिदूत परिवारच्या वतीने प्रगतशील शेतकऱ्यांची बैठक शनिवारी उमरगा येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई जाधव अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सेंद्रिय शेती तज्ज्ञ विकास देशमुख, राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, डॉ. प्रताप ठुबे, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, माजी कृषी अधिकारी मुरलीधर जाधव, प्रगतशील शेतकरी उमेश जाधव आदी उपस्थित होते.
ज्याला माती कळली त्याला शेती कळली. मातीतील विषाणूचा ऱ्हास होत असून, विषमुक्त धान्य व भाजीपाला पिकविण्यासाठी युवकांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन सेंद्रिय शेती तज्ज्ञ विकास देशमुख (सातारा) यांनी यावेळी केले. डॉ. विठ्ठलराव जाधव, कृषी अधिकारी सुनील जाधव, प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे (मुर्टा) यांनी शासनाच्या विविध योजना विषयी माहिती देऊन शांतीदूत परिवार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. बैठकीस शकुंतलाताई मोरे, जकेकूरचे सरपंच अनिल बिराजदार, छाया मोरे, प्रा. जीवन जाधव, प्रा. युसुफ मुल्ला, बालाजी माणिकवार, प्रा. अभय हिरास, प्रमोद बिराजदार, किशोर औरादे, राम जवान, देविदास भोसले, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक, प्रा. युसुफ मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जीवन जाधव यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी उपस्थित होते.