तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद ठेवल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे मर्यादीत संख्येचे कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरातील प्रवेश सुरू ठेवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन न करता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. वास्तविक तुळजापूर शहर ७० टक्के श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद म्हणजे तुळजापूर शहर व तालुका बंद, अशी परिस्थिती आहे. मंदिरावर पुजारी शहरातील छोटे-मोठे व्यापारी, तालुक्यातील शेतकरी व इतर कामगार यांची रोजी रोटी चालते. परंतु, आता मंदिर बंद झाल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. पहिल्या ८ महीन्याच्या लाॅकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. पूर्णपणे अर्थचक्र बिघडलेले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन म्हणजे कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची वेळ आलेली आहे.
त्यामुळे ज्या पध्दतीने ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक चालू ठेवली आहे, त्याच प्रमाणे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मार्यादीत संख्येने कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरात पूर्वीप्रमाणे प्रवेश सुरु ठेवावा. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु, इतर मोठ्या शहरात दररोज हजारोच्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडून देखील तेथील सर्व अस्थापना सुरु आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कठोर निर्बंध लावून सर्व लहान-मोठ्या अस्थापना सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तहसीलदारांमार्फत हे निवेदन पाठविण्यात आले. यावर इंद्रजीत साळुके, विजय भोसले, प्रसाद पानपुडे, दिनेश बागल, राम चोपदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.