ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १४ : मराठवाड्यात सतत चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे शासनाच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडला आहे. पिण्याचे पाणी, चारा व इतर उपाययोजनांसाठी विभागात आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात ६०० कोटींचा तर मे व जून २०१६ या दोन महिन्यांतील संभाव्य निधी १०० कोटी असे ७०० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. चार वर्षांपासून दुष्काळ पडत असला तरी २०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली.
चाराटंचाई आणि पिण्याचे पाणी या सुविधा देण्यासाठी शासनाला आजवर ६०० कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यात द्यावा लागला. अजून दोन महिन्यांच्या नियोजनाचा निधी येणे बाकी आहे. यंदाचा मान्सून सुरू होऊन आठवडा झाला आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचे टँकर कमी होत नाही. विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित जिल्हे अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
२५० कोटींचा चारा बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील चारा छावण्या १५ जून्पासून बंद करण्यात येणार आहे. काही तुरळक छावण्या माणुसकीच्या नात्यातून सुरू राहणार आहेत. असे सूत्रांनी सांगितले. चारा छावण्यांवर साडेसात महिन्यांत २५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. बीड जिल्ह्यात २६५ छावण्यांमध्ये २ लाख ६२ हजार, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८५ चारा छावण्यांमध्ये ७८ हजार लहान मोठ्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. पूर्वमोसमी पावसानंतर ८ जून रोजी बीड जिल्ह्यातील २२२ तर उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या ५६ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित छावण्या १५ जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.
पाण्यावर पाण्यासारखा खर्चमराठवाड्यातील ४ हजार गावांत ४ टँकरने पाणी आजही पुरविले जात आहे. टँकर व इतर योजनांसाठी एप्रिलपर्यंत २२७ कोटींचा खर्च झाला. १२७ कोटींचा निधी अजून येणे बाकी आहेत. ३४७ कोटींच्या खर्चाचे नियोजन विभागीय प्रशासनाने केले होते. मे व जून या दोन महिन्यांसाठी किमान १०० कोटींची संभाव्य मागणी असेल. चारा छावण्या २५० कोटी, टँकरवर ३४७ कोटींचा असे ५९७ कोटी आजवर खर्च झाले आहेत.