एसटी येऊ लागली रुळावर, ३३ हजार प्रवासी करताहेत बसने प्रवास
उस्मानाबाद : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मंगळवारपासून ११२ वरून २४० बसेस सुरू करण्यात आल्या असून, प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या प्रतिदिन ३३ हजार प्रवासी बसचा प्रवास करीत आहेत. यातून एसटीला दिवसाकाठी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केली आहे. प्रथम ४८ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने ११२ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मंगळवारपासून प्रवाशांची गर्दी पाहता एसटी महामंडळाने ६ आगारांतून २४० बसगाड्या सोडल्या आहेत. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील विविध मार्गांवर या बस ७० हजार किलोमीटर प्रवास करीत आहेत. प्रतिदिन ३३ हजार प्रवासी बसने प्रवास करीत असून, एसटीला यातून दिवसाकाठी १८ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या जिल्ह्यात चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहत आहेत. त्यामुळे नागरिक चार वाजेपर्यंतच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे चारपर्यंत बसला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. चारनंतर प्रवाशांची संख्या कमी असते. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्यानंतर मात्र सहा आगारांतील सर्वच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी...
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे महामंडळाकडून बस सॅनिटाईझ केल्या जात आहेत. तसेच प्रवाशांना प्रवास करतेवेळी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
पाच पथकांकडून होतेय तपासणी
एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाचे एकूण ५ मार्ग तपासणी पथके कार्यरत आहेत. या पथकामार्फत सध्या बसेसचे निर्जंतुकीकरण होत आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. एक पथक दररोज सरासरी ४० बसेस तपासणी करीत आहे. त्यामुळे आगाराकडून बसच्या फेरीनंतर निर्जंतुकीकरण केले जात आहे.
रातराणी गाड्याही सुरू
एसटी बसला प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता एसटीने रातराणी बसेसही सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे, बोरीवली, भिवंडी, कोल्हापूर या मार्गावरील बसेस धावत आहेत.
राज्याबाहेर जाणाऱ्या बसेस बंद
राज्यातून इतर राज्यांत जाण्यास अद्याप परवानगी नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून हैदराबाद, हुमनाबाद, सुरत, पणजी, बंगलोरला जाणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेर राज्यात खासगी वाहनांनीच प्रवास करावा लागत आहे.
३० टक्के प्रवासी करताहेत प्रवास
लॉकडाऊनपूर्वी उस्मानाबाद विभागातील ४५० बसच्या सुमारे दोन हजारांच्या जवळपास फेऱ्या होत. प्रतिदिन बसचा १ लाख ६५ किलोमीटर प्रवास होत असे. जवळपास सव्वा लाख प्रवासी प्रवास करीत. यातून एसटीला प्रतिदिन ५० लाख रुपयांचे उत्पन्न होत होते. सध्या प्रतिदिन २४० बसच्या १ हजार फेऱ्या होत आहेत. ७० हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, ३३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. एसटीला १८ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.