वाशी : शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार व मोबाइल क्रमांक लिंक करण्याचे काम १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. अन्यथा मार्च महिन्यापासून शिधापत्रिकेवर धान्य मिळणार नाही, असा इशारा तहसीलदार नरसिंग जाधव यांनी पत्रकाद्वारे दिला आहे़
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत रास्त धान्य दुकानातून काळाबाजार होऊ नये, यासाठी ई-पॉस मशिनवर शिधापत्रिकाधारकांचा अंगठा लावून धान्याचा लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे़ त्याकरिता शिधापत्रिकेवरील सर्व लाभधारकांचे आधारकार्ड व मोबाइल क्रमांक ई-पीडीएस पोर्टलवर शिधापत्रिका १०० टक्के जोडण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्याकरिता रास्त भाव दुकानातील ई-पॉस मशिनमधील ई-केवायसी व मोबाइल सिडिंग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाइल क्रमांक सिडिंग १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत़
शिधापत्रिकेशी आधार लिंक केलेले नसल्यास शिधापत्रिकाधारकांना पात्र असूनही धान्य मिळणार नाही. त्याकरिता तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या नोंदणीकृत दुकानदारांकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक लिंक करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कार्डधारकाने आपल्या शिधापत्रिकेवरील धान्य ज्या त्या महिन्यातच अखेरच्या तारखेपर्यंत उचलावे. त्यानंतर धान्य देता येणार नाही, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.