अणदूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बैठक घेऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी यात्रौत्सव रद्द करण्याचे आवाहन केले होते. शिवाय, मोठ्या प्रमाणात यात्रा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, पुजारी मंडळाने देखील पुढाकार घेतला आहे. भाविकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत यात्रेला येणे टाळल्यामुळे मंदिर परसिरात सध्या शुकशुकाट दिसत आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मीचा यात्रौत्सव शेकडो वर्षांपासून प्रसिध्द आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासोबतच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून देखील हजारोंच्या संख्येने भाविक चिवरीमध्ये दाखल होत होते. मात्र, यंदा यात्रौत्सव रद्द झाल्याने शेकडो पोतराज, आराधी, जान्यांचा नृत्य, त्यांच्या हस्ते विधिवत पूजा, पारधी समाजातील हजारो भक्तांची यात्रेतील वर्दळ दिसेनासी झाली आहे. यात्रेत होणारा ‘आई राजा उदे उदे’ चा सूरही बंद झाला आहे.
या यात्रेकडे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांचे विषेश लक्ष असून, नळदुर्ग पोलीस ठाण्याचा ताफा चोख बंदोबस्तासाठी बोलावण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिर स्थापनेनंतर यंदा प्रथमच हा यात्रौत्सव रद्द करण्याची ही पहिली वेळ आहे. यासाठी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड, तलाठी डी. एन. गायकवाड, देवस्थान ट्रस्टचे ज्ञानदेव पाटील, अनिल गायकवाड, जयपालसिंह बायस, ज्ञानदेव झिंगरे, प्रभाकर बिराजदार, भिमराव देडे, विश्वनाथ कोरे, रवींद्र शिंदे, सुरेश भुजबळ, पोलीस पाटील योगेश बिराजदार, मोतीराम चिमणे, बालाजी शिंदे यांच्यासह दुकानदार, पुजारी मंडळाने पुढाकार घेतला आहे.
चौकट..
कडक बंदोबस्त
भाविकांनी मंदिरात येऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर बॅरिगेट्स लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, मंदिर परिसरात देखील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतले. दरम्यान, यात्रौत्सव रद्द झाला असला तरी यानिमित्त होणारे आंबटभात कार्यक्रम, पालखीची मिरवणूक, अभिषेक, पूजा, नैवद्य आदी धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत.