उस्मानाबाद : एकीकडे विविध आंदोलनाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस इलेक्शन मोडमध्ये येत असतानाच राष्ट्रवादीनेही संपर्कयात्रेतून आगामी निवडणुकांची पेरणी सुरू केली आहे. मग शिवसेना तरी कशी मागे राहणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेनेही शिवसंपर्क अभियान सुरू केले असून, अगदी गावपातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील हे या अभियानातून शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अभियान हे तुळजापूर तालुक्यात झाले. येथे प्रत्येक पंचायत समिती गणात हा उपक्रम राबवून शिवसैनिकांना चार्ज करण्याचा करण्याचा प्रयत्न केला गेला. आमदार कैलास पाटील यांच्यासमवेत युवासेनेचे राज्यविस्तारक अविनाश खापे-पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, श्याम पवार, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, ज्येष्ठ शिवसैनिक भीमा जाधव, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, सुनील जाधव, संजय भोसले, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख आमीर शेख, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण पाटील यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
योजनांचा लाभ मिळवून द्या : कैलास पाटील
शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांशी संवाद साधतानाच सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी, विविध घटकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. शिवाय, महाविकास आघाडी सरकारने केलेली विकासकामेही नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. प्रत्येक शिवसैनिकांनी गावातील नागरिकांशी संपर्क वाढवत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ सोडविण्यासाठी तत्पर राहून शिवसेनेचे विचार तळागाळात रुजविण्याचे काम करावे, असेही आमदार पाटील म्हणाले.
गावगाड्यावर सेनेचे लक्ष...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आंदोलने होत आहेत. मेळावे होत आहेत. बूथ मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद सुरू झाले आहेत. यातील बहुतेक उपक्रम हे जिल्ह्याला किंबहुना तालुका पातळीवर होत आहेत. मात्र, सेनेने याहीपुढे जाऊन पंचायत समिती गणापासून सुरुवात केली आहे. या संपर्काच्या स्पर्धेत कोण यशस्वी ठरतो, हे तर आगामी निवडणुकांच्या निकालानंतरच कळेल.