उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. पक्षाच्या सभासद नोंदणी शुभारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसैनिकांच्या बळावर उभा राहिलेला हा गड अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. सध्या शासनामध्ये आपल्या हक्काची लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यातील वैद्यकीय महाविद्यालयासारखा महत्त्वाचा विषय मार्गी लावून हे सरकार फक्त घोषणा करत नाही तर प्रत्यक्षात काम करते, हे दाखवून दिल्याचे शिंदे म्हणाले.
यापुढील नगरपालिका, नगरपंचायती व त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेची शक्ती वाढणे गरजेचे आहे. हा गड अधिक भक्कम करून शिवसैनिकांच्या हातात स्थानिक संस्थांचा कारभार आला पाहिजे. यासाठी तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चौकट.....
महाविकास आघाडीने आमचे स्वप्न पूर्ण केले
वास्तविक १९९२ मध्येच उस्मानाबादचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असते; परंतु ते दुसरीकडेच पळविले गेले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आमचे हे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले आहे. शहरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नसल्याने लातूर वा सोलापूरला जावे लागत होते. प्रथम या महाविद्यालयाचा ‘पीपीपी’ प्रस्ताव होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णत: शासनच हे महाविद्यालय उभारेल, असे सांगितले असल्याचे खा. राजेनिंबाळकर म्हणाले.