धुळीमुळे पिके धोक्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तामलवाडी : सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खडी क्रशर केंद्राच्या धुळीमुळे लगतच्या तामलवाडी शिवारातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे हे खडी क्रशर बंद करण्याची मागणी येथील शेतकऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील सुनील सावंत, ज्ञानेश्वर जगताप, नागनाथ भाकरे, बाळासाहेब जगताप यांच्या शेतजमिनी जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. येथून जवळच खडी क्रशर केंद्र असून, याच्या धुळीमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच विहिरीचे पाणीही दूषित झाले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
अवैध दारू विक्री; ठिकठिकाणी छापे
उस्मानाबाद : जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून पोलिसांनी कारवाई केली. ५जानेवारी रोजी भूम पोलिसांनी वालवड येथे छापा टाकला. यावेळी प्रकाश शिंदे हा देशी दारूच्या बाटल्यांसह त्याच्या राहत्या पत्रा शेडमध्ये मिळून आला. उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलिसांनी ६ जानेवारी रोजी रमाई नगर भागात जया पवार या महिलेकडून गावठी दारू जप्त करून कारवाई केली. तसेच शहर पोलिसांनी शहरातील हातलादेवी परिसरात किरण काळे हा गावठी दारू व दारू निर्मितीच्या द्रव पदार्थासह पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी सर्वांविरुध्द संबंधित पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
उद्याने दुर्लक्षित
उस्मानाबाद : शहरात देशपांडे स्टँडनजीकचे जिजामाता उद्यान, समतानगरातील संभाजी उद्यानाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील खेळण्यांची पूर्णत: मोडतोड झाली असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
देशी दारू जप्त
भूम : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ५ जानेवारी रोजी पाथरूड येथे छापा टाकला. यावेळी रोहन पौळ याच्याकडे एका पिशवीत देशी दारूच्या १७ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.
एकावर कारवाई
येरमाळा : कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे रामचंद्र पवार हा हॉटेल बांगर बंधू समोरील एका पानटपरीत विदेशी दारूच्या दहा बाटल्यांसह पोलिसांच्या पथकास मिळून आला. यावरून त्याच्याविरूद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पिकांवर परिणाम
कळंब: यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु, काही दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे हरभरा, गहू, ज्वारी ही पिके धोक्यात आली आहेत.
मोबाईलधारक त्रस्त
मुरूम : उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरातील अनेक गावात बीएसएनएल मोबाईलची रेंज सातत्याने विस्कळीत होत आहे. यामुळे गावातल्या गावातही मोबाईल लागत नसल्याने ग्राहक त्रस्त असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.