बालाजी अडसूळ / कळंब (जि. उस्मानाबाद) : यंदाच्या वर्षी केळी, बटाट्यांनी शेतक-यांना जेरीस आणलेच आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो पिकानेही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आवळली आहे. दर प्रचंड घसरल्याने अगदी काढणीसही न परवडणारा वाकडी शिवारातील पाच टनांच्या आसपास टोमॅटोचा वावरात पडून लाल चिखल तयार होतोय.
शेती क्षेत्रात बदल घडत आहेत. काळानुरूप पीक पद्धती कात टाकत आहे. यातील नवप्रयोगातून अनेक यशकथा समोर येत आहे. असे सुखद चित्र एकीकडे असले तरी शेती अन् यावर कायम घोंघावणाऱ्या संकटाचा काही केल्या काडीमोड होत नसल्याचे दिसून येत आहे.
केळी, बटाट्यापाठोपाठ आता अनेक गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचाही या हंगामात घसरलेल्या दराने मोठा भ्रमनिरास केला असल्याचे समोर आले आहे.
नफा अन् उत्पादन खर्च तर सोडा, काही तोड्यांचा काढणी खर्चही पदरी पडला नसल्याचे समोर आले आहे. वाकडी (केज) येथील परमेश्वर आण्णासाहेब कोल्हे, त्यांचे बंधू उत्रेश्वर, ज्ञानेश्वर यांनी दिवाळीत एकरभर क्षेत्रात नांगरणी, रोटर, शेणखत, बेड, भेसळढोस, मल्चिंग असे पूर्वमशागतीचे सोपस्कार पार पाडत टोमॅटोच्या अलंकार वाणाची ६ हजार रोपांची लागवड केली होती.
योग्यवेळी, योग्य ती काळजी घेत पीक जोपासले व वाढवले होते. जवळपास तिसेक हजाराचा खर्च करून बांबू, तार यांचा आधार दिला होता. मात्र, कष्टाने लगडलेल्या दर्जेदार मालास ‘मार्केट’ दाखवण्याची वेळ आली की भाव कोसळले. पंधरा-वीस रुपये किलोने जाणारा माल तीन, चार रुपयानेही जात नव्हता. यामुळे दीडेक लाख नफा राहिला बाजूला, उलट केलेला लाखभर खर्च ही वाया गेला.
पुन्हा लाल चिखलाची अनुभूती....
वाकडी गावाशेजारच्या हसेगाव येथील भूमिपूत्र असलेल्या प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांनी चार दशकांपूर्वी हतबल झालेल्या आबांने भरल्या बाजारात टोमॅटो पायदळी तुडवल्याचे विदारक चित्र आपल्या ‘लाल चिखल’ या गाजलेल्या कथेतून मांडले होते. याचीच पुनरावृत्ती लगतच्या व शिवेवरील वाकडीत पुन्हा झाली आहे. कोल्हे यांनी आपल्या रानात लगडलेल्या तोड्यातील जवळपास पाचेक हजार किलो माल शेतात काढून फेकला आहे. यामुळे सा-या वावरात लालगर्द टोमॅटोचा सडा पडला आहे.
काढणीचा खर्च ही हाती येईना...
यासंदर्भात उत्रेश्वर कोल्हे यांनी सांगितले की हंगामात आठ, दहा तोडे होत असतात. प्रारंभी माल कमी होता व भावही तसा खास नव्हता. पुढे वाढेल या आशेने खर्च सुरूच होता. मात्र, माल वाढत गेला तसा भाव कमी झाला. यामुळे शेवटी दहा-बारा मजुराकरवी काढलेला माल तोट्यात विकला चालला. यातून काढणीचा खर्च ही मिळणे कठीण झाले. यामुळे राहिलेल्या तीन, चार तोड्याचा माल पीक मोडत वावरात फेकला आहे.
लॉकडाऊनमधील कष्ट; पण मार्केट....
उत्रेश्वर कोल्हे व त्यांचा एक भाऊ इंजिनिअर आहेत. दोन्ही तरुण लॉकडाऊन काळात गावी आले अन् अडकले. यानंतर त्यांनी शेतात झोकून देत टोमॅटो पिकात लक्ष घातले. घरातील सर्वांच्या कष्टाने अपेक्षित मालही आणला. परंतु, त्यांचे हे प्रयत्न ‘मार्केट’ नावाच्या व्यवस्थेने फोल ठरवले.
080221\08osm_1_08022021_41.jpg
वाकडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकर्यांनी टोमॅटोचे दर घसरल्याने सुमारे पाच टनापेक्षाही अधिक माल असा शेतातच टाकून दिला आहे.