कळंब (उस्मानाबाद) : पोलिसांच्या विरोधात निवेदन दिल्याने कळंब शहरात भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत मंगळवारी राडा झाला. यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे डोके फुटल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी कळंब ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कळंब येथील भाजयुमोचे तालुकाध्यक्ष प्रशांत अच्युतराव लोमटे यांनी सोमवारी तालुक्यात बोकाळलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध तहसीलदारांकडे निवेदन दिले होते. पोलिसांवरही आरोप करीत त्यांच्यावरही कार्यवाही आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले होते. यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष दिनेश जाधव यांनी लोमटे यांना फोन करून काही बोलायचे आहे, असे सांगितले व भेटण्यासाठी शहरातीलच एका बिअर शॉपीवर येण्यास सांगितले. त्यावर लोमटे यांनी ढोकी नाक्यावर भेटण्याबाबत कळविले. याठिकाणी दोघांची भेट झाल्यानंतर दिनेश जाधव याने प्रशांत लोमटे यांना अवैध धंद्याच्या विरोधात निवेदन का दिले, अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचवेळी दिनेश जाधवसोबत असलेल्या विजय सावंत याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय, जाधव याने दुचाकीस अडकविलेला रॉड काढून डोक्यात मारला. या मारहाणीत प्रशांत लोमटे हे जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्परविरोधी तक्रार...
दरम्यान, मारहाणीचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या दिनेश जाधव यांनीही परस्परविरोधी तक्रार दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रशांत लोमटे याने त्याच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तक्रारीत असल्याचे कळते. मात्र, याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, या मारहाण, आरोप-प्रत्यारोपाने कळंबचे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले असून, काही जिल्हास्तरीय नेत्यांनीही यात लक्ष घातल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.