ईट : आसलकर, चव्हाण यांची निवड
ईट : येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, सरपंचपदी संजय आसलकर तर उपसरपंचपदी माधुरी चव्हाण यांची निवड झाली. या निवडीनंतर विजयी उमेदवारांची उंटावरून मिरवणूक काढत जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भूम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ईटकडे पाहिले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सिध्देश्वर ग्रामविकास पॅनल व राकाँ, भाजपा, शेतकरी संघटना पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास आघाडी यांच्यात लढत झाली. यात परिवर्तन ग्रामविकास आघाडीने पंधरा पैकी आठ जागा ताब्यात घेतल्या. सोमवारी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी बैठक पार पडली. यावेळी परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे संजय आसलकर यांची सरपंचपदी तर माधुरी चव्हाण यांची उपसरपंचपदी नऊ विरुध्द सहा मतांनी निवड झाली. यानंतर नूतन सरपंचांची उंटावरून मिरवणूक काढून सिध्देश्वर मंदिरात नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पॅनलचे सर्वेसर्वा प्रा. डॉ. आप्पासाहेब हुंबे, काकासाहेब चव्हाण, सुनील देशमुख, सयाजीराजे हुंबे, मनोहर देशमुख, राजाभाऊ हुंबे, विनोद वाडकर, बलीमहंमद काझी, सुभाष वेदपाठक आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून बी. व्ही. शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी मुकुंद देशमुख यांनी सहकार्य केले.