उस्मानाबाद : काेविड रुग्णांची संख्या वाढीस लागलेली असल्याने पुढील काळात उपचारात बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील ११ खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करीत त्यातील २२३ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.
जिल्ह्यात ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढत आहे, ती पाहता येत्या काही दिवसांत सरकारी रुग्णालयांतील खाटा अपुर्या ठरणार आहेत. तत्पूर्वीच जिल्हाधिका-यांनी कोविड केअर सेंटर व समर्पित कोविड केअर सेंटर सुरु करुन खाटा उपलब्ध करुन घेतल्या आहेत. मात्र, गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा कमी पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, अधिग्रहीत करण्यात आलेल्या जी रुग्णालये महात्मा ज्योतीराव फुले योजनेत अंगीकृत आहेत, तेथे रुग्णालयांनी लाभार्थी कोविड रुग्णांना उपचार देणे बंधनकारक असल्याचेही दिवेगावकर यांनी आदेशात म्हटले आहे.
ही आहेत रुग्णालये...
उस्मानाबाद शहरातील निरामय हॉस्पीटलमध्ये १८, पल्स हॉस्पीटल येथे ३०, सह्याद्री हॉस्पीटल येथे २५, सुविधा हॉस्पीटलमध्ये २५, चिरायु हॉस्पीटलमध्ये १५, तुळजापूर येथील कुतवळ हास्पीटलमध्ये १५, उमरगा येथील गजानन हॉस्पीटल, शिवाई हॉस्पीटल येथे प्रत्येकी १५, डॉ.डी.के.शेंडगे हॉस्पीटल येथे २५, कळंब येथील श्रीकृष्णा हॉस्पीटलमध्ये २५, तर वाशी येथील विठ्ठल हॉस्पीटलमध्ये १५ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांना नियुक्त करण्यात आले आहे.