कळंब : खामगाव-पंढरपूर रस्त्याच्या कळंब शहर हद्दीतील लांबीच्या पूर्णत्वास ठेकेदार विलंब लावत आहे. त्यामुळे कळंब येथील मुख्य रस्त्यावर सोमवारी पावसाने चक्क तळे साचले होते. या गाळयुक्त डबक्यातून 'मार्ग' काढताना वाहनधारकासह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने दिवसभर संताप व्यक्त केला जात आहे.
खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातील बीड जिल्ह्यातील केज ते बार्शी तालुक्यातील कुसळंब या साठ किलोमीटर लांबीच्या कामाचा ठेका हैदराबादस्थित एका कंपनीला दिला आहे. याच लांबीत कळंब ते येरमाळा ही तालुक्यातील तीस किलोमीटर लांबी संलग्न केली आहे. त्यात कळंब शहरातील चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. कळंब ते येरमाळा दरम्यानचे बहुतांश काम संपत आले असले तरी येरमाळा गाव, कळंब शहर हद्द व कन्हेरवाडी पाटी या तीन टप्प्यांत कंपनीला काम करण्यास आवश्यक ती गती मिळत नसल्याने या रखडपट्टीचा नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यातच कळंब शहरातील बसस्थानक परिसर ते तहसील कार्यालय हा अंदाजे दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची गती अतिशय संथ होती. त्यामुळे मागच्या तीन महिन्यांपासून हे काम सुरूच आहे. त्यातच मागच्या पंधरा दिवसांपासून पडलेल्या पावसाने या भागात मोठी दयनीय अवस्था झाली असून, चिखलमय डबक्यातून वाहने काढताना नागरिकांना, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट...
गुडघाभर खड्डा, त्यात चिखल अन् पाणी...
कळंब शहरातील ‘प्राईम लोकेशन’ व दिवसभर वर्दळ असलेल्या बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व तेथून होळकर चौकापर्यंतचे काम रखडले आहे. एकाबाजूने कॉंक्रिटीकरण पूर्ण झालेले असले तरी दुसरी बाजू सध्या खड्ड्यातच आहे. त्यातच पावसाने या रखडलेल्या लांबीत मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले आहे. या चिखलमय डबक्यातून व गुडघाभर खड्ड्यांतून वाहन बाहेर काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहने घसरत आहेत, लोक घसरगुंडी होऊन पडत आहेत.
दलदलीत पुन्हा वाहतूक कोंडी...
सोमवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने कळंब शहरात ग्रामीण भागातील अनेकांचे पाऊल पडते. कोरोनाचे निर्बंध असले तरी सोमवारी अनेकजण सवयीप्रमाणे कळंबमध्ये येतात. त्यातच छत्रपती शिवाजी चौक ते होळकर चौकादरम्यान एकेरी वाहतूक, दुसरीकडे निर्माण झालेले डबके, त्यात साठलेले तळे व चिखल कमी होता की काय म्हणून दुपारी अनेकवेळा वाहतूक कोंडीही होत होती. यामुळे वाहनांना अर्धा-अर्धा तास ताटकळत बसावे लागत होते.
आले कंपनीच्या मना...
कळंब शहरातील कामाचा ठेका घेतलेली कंपनी आपल्याच ठेक्यात चालत आहे. लोकांना, वाहनधारकांना होणारा त्रास याचे त्यांना काही देणंघेणं नाही. आपल्या मनावर काम सुरू अन् मनावर काम बंद अशी स्थिती आहे. यामुळे शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातून आल्यागेल्या लोकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. मेडिकल इमर्जन्सी असलेल्या रुग्णांना अडकावून बसावे लागत आहे. असे असले तरी कोणाचे काही चालत नाही. यामुळे कामास गती द्यावी, अशी मागणी होत आहे.