मुरूम : उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मु.) ग्रामपंचायतीच्या सातपैकी ६ जागांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे वाॅर्ड क्रमांक तीनच्या एका जागेसाठी निवडणूक लागल्याचे सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले.
नाईकनगर (मु.) गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास असून, ४५० मतदार आहेत. तीन प्रभाग असून, प्रभाग १ मधील ३ आणि प्रभाग २ मधील २ आणि प्रभाग ३ मधील २ पैकी १, अशा ६ जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. प्रभाग ३ मधील एका जागेसाठी रितेश रमेश जाधव आणि मुसा इसाक मासुलदार यांच्यात थेट लढत होत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीतही ७ पैकी ६ जागांची निवडणूक बिनविरोधच झाली होती. यंदाही गेल्या वर्षीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद महिलेसाठी आरक्षित होते. तेव्हा सरपंचपदी धानाबाई राठोड विराजमान झाल्या होत्या. यंदा मात्र सरपंचपदाचे आरक्षण सदस्यांच्या निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सरपंचपदाचे औत्सुक्य सर्वांनाच लागून राहिले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक माणिक राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा सरपंच योगेश राठोड यांच्यासह मुरूम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. यामुळे ७ पैकी ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
चौकट.......
नाईकनगर गावात नाईकनगर (सु.) आणि ग्रामपंचायत नाईकनगर (मु.), अशा २ ग्रामपंचायती आहेत. यापैकी सध्या नाईकनगर (मुरूम) निवडणूक लागली असून, येथेही ७ पैकी ६ जागा बिनविरोध निवडून आल्याने फक्त एका जागेसाठीच आता गावात मतदान होणार आहे.
परिसरातील गणेशनगर ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार मैदानात असून, काँग्रेसच्याच २ पॕॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे. मुरळी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी दुरंगी लढत होत असून, विद्यमान सरपंच, तर उपसरपंचांच्या पत्नी मैदानात आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शमशोद्दीन जमादार यांचे जनशक्ती पॕॅनल, तर काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत माजी उपसरपंच अमर सूर्यवंशी यांच्या लोकशाही पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे. गेल्या १० वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व आहे. दाळिंबमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी यांचे पॅनल आणि काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.