उस्मानाबाद : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी सुमारे २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पाेलीस शिपायास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी उस्मानाबादेत केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या आई आणि दोन भावांविरूद्ध उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याकडे होता. पोलीस उपनिरीक्षक शेख यांचे मदतनीस पोलीस शिपाई प्रदीप तोडकरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांची आई आणि एका भावास ‘एमसआर’ करून जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांचे गुन्ह्यातून नाव काढून टाकण्यासाठी १७ एप्रिल रोजी पंचासमक्ष ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. संबंधित विभागाने सत्यता पडताळली असता, उस्मानाबाद शहरात सापळा रचला. यावेळी पाेलीस शिपाई ताेडकरी यांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस अंमलदार इफतेकार शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी रविवारी सकाळी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला आहे.