उमरगा शहरात रोडरोमियो व टवाळखोर तरुणांनी मोठा उच्छाद मांडला असून, क्षुल्लक कारणावरून भांडणे, धमक्या देणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. यात विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग दिसून येतो. तसेच पोलिसांसमक्ष सिनेस्टाईल हाणामारीचे
दोन-तीन प्रकार घडून याच्या व्हीडीओ क्लीपही समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या. यामुळे शहरवासियांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यासोबतच शहरात मटका स्वरूपाचे ऑनलाईन ‘गुडगुडी’ हा अकड्याचा खेळ देखील जोमात सुरू आहे. येथेही पैसे देण्याघेण्यावरून कायम भांडणे होत असतात. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी शहरात गस्त वाढवून ‘गुडगुडी’सह अवैध धंद्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेतली. विशेषत: शहरात पतंगे रोड, अशोक चौक, बाजारपेठ, बसस्थानक, शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली असून, विनाकारण रस्त्यावर थांबण्यास व हुल्लडबाजी करण्यास मज्जाव घातला जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात केल्याने शहरवासियांत समाधान व्यक्त होत आहे.