तामलवाडी : नऊ महिन्यांपूर्वीच हस्तांतरण झालेल्या तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील अंगणवाडी इमारतीच्या छताचा गिलावा ढासळल्याने या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सदुैवाने या घटनेत कुणालाही इजा पोहोचली नाही.
एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गोंधळवाडी येथे बालकांसाठी अंगणवाडी क्र. ५०२ चालविली जाते. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ लाख रुपये खर्चून इमारत उभारण्यात आली. नऊ महिन्यांपूर्वी याचे हस्तांतरण केले आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडी कार्यकर्ती सुमित्रा माने व मदतनीस माया मोटे या बालकांना आहार वाटप, अन्य कामकाज करीत असताना अचानक सिमेंट स्लॅबच्या खालील भागाचा गिलावा इमारतीच्या खोलीत ढासळला. माता पालक गंगुबाई आयवळे व मदतनीस माया मोटे या पोषण आहार घेऊन दरवाजाजवळ जात असताना पाठीमागे हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अंगणवाडी इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने छताचा गिलावा ढासळत असून, अन्य भिंतीचा भाग फुगल्याचे अंगणवाडी कार्यकर्तीनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच सरपंच राजाभाऊ मोटे, गणेश सातपुते, भागवत मोटे, अजित मोटे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, पालकांनी अंगणवाडीस भेट देऊन पाहणी केली.
चौकट.........
वरिष्ठांचे दुर्लक्ष
गोंधळवाडी येथील अंगणवाडी क्र. ५०२ च्या इमारतीसाठी शासनाकडून ८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. इमारतीचे बांधकाम ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे सध्या अंगणवाडीत बालकांना बोलावून दैनंदिन पोषण आहार वाटप करून घरी पाठविले जाते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोषण आहार वाटप करतानाच हा प्रकार घडला. यावेळी सुदैवाने बालक अंगणवाडीत नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घटना घडली असती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.
कोट.....
अंगणवाडी इमारतीच्या पडलेल्या गिलाव्याची माहिती गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना फोनद्वारे दिली आहे. दुपारपर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी अंगणवाडीस भेट दिली नाही. कामाचा दर्जा तपासला नसल्याने भर उन्हाळ्यात इमारतीचे काही भाग ढासळतात, ही चिंतेची बाब आहे. सदरील निकृष्ट बांधकामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी.
- राजाभाऊ मोटे,
सरपंच, गोंधळवाडी
अंगणवाडी इमारतीच्या छताचा गिलावा पडल्याची माहिती समजली. हे काम ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. छताचा गिलावा कशामुळे पडला, याची माहिती ग्रामसेवकाला विचारून घेत आहे.
- संतोष हावळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, तुळजापूर