पाथरुड : कोरोना काळात ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वृक्ष लागवडीचे महत्त्व सगळ्यांनाच उमगले असून, याच अनुषंगाने भूम तालुक्यातील राळेसांगवी येथील टाळके कुटुंबीयांनीदेखील पुढाकार घेतला आहे. मयताच्या स्मृती स्मरणात राहाव्यात, यासाठी टाळके कुटुंबाने गावात सार्वजनिक ठिकाणी जवळपास शंभर वृक्षांची लागवड केली असून, यासाठी ठिबक सिंचनाचीदेखील सोय केली आहे.
भूम तालुक्यातील राळेसांगवी येथील ग्रामसेवक एम. एन. टाळके यांचे मोठे बंधू भास्कर नामदेव टाळके (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे टाळके कुटुंबाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ परिसरात शंभर वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षातही आणला. २७ मे रोजी या कुटुंबाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यालगत वड, पिंपळ, जांभूळ, पेरू अशा विविध शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष जोपासण्याठी टाळके कुटुंबीयाने ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. त्यांच्या या उपक्रमास तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, गटविकास अधिकारी भागवत ढवळशंख यांनीही भेट देऊन कौतुक केले.