वाशी : तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील साठवण तलावाची भिंत खचल्यामुळे तहसीलदारांनी जेसीबीच्या सहाय्याने कालवा खोदून पाण्याचा विसर्ग केला. यामुळे होणारा संभाव्य धोका टळला आहे़
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (को़ ) गावालगत जुना साठवण तलाव आहे़ या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा तलाव तुडुंब भरला आहे़ त्यातच रविवारी पहाटेपूर्वी या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे तलावातील पाण्याचा साठा वाढला़ यामुळे तलावाच्या भरावाची मुख्य भिंत खचली असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाल्यानंतर तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी शिवाजीराव उंदरे यांनी धाव घेत पाहणी केली. यावेळी तलावाच्या भरावाची मुख्य भिंत खचली असल्याचे निदर्शनास आल्याने लागलीच जेसीबीच्या साहाय्याने तलावाचा सांडवा खोदून त्याची खोली वाढवली व पाण्याचा विसर्ग वाढवला़
हा साठवण तलाव गावालगत वरील बाजूस आहे़ त्यामुळे तो फुटल्यास संपूर्ण गाव वाहून जाण्याचा धोका आहे. या तलावाच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी साहेबराव कुरुंद यांनी केली आहे़