मुरुम : शहरातील विविध भागात आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाकडून चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. परंतु, याला शहरवासीयांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. त्यामुळे चार दिवसात ४५ वर्षावरील केवळ १४१ जणांनीच कोविशिल्ड लस टोचून घेतली. शुक्रवारी २७, शनिवारी २३, सोमवारी ३१ तर मंगळवारी ६० जणांनी लस घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे आयसीएमआर व शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोविशिल्ड लसीबाबत समज-गैरसमज आजही कायम आहेत. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यासाठी शहरवासीयांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले, त्या भागात पालिकेकडून चार दिवस ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक सेंटरवर २०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. शहरात आठ सेंटर लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. पालिका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मुरुम शहरात घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. जवळपास १ हजार ६०० जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाचे होते. यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी प्रभागनिहाय प्रत्येक नगरसेवकांना पत्र पाठवून आपापल्या प्रभागातील ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी जागरूक करावे, असे आवाहन करण्यास सांगितले.
शहरातील किसान चौकातील ॲक्टिव्ह नगरसेवक अजित चौधरी यांनी आपल्या प्रभागातील सर्वाधिक ६० नागरिकांचे लसीकरण करून घेतले. उर्वरित प्रभागात मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुक्रवार ते मंगळवारपर्यंत केवळ १४१ जणांनीच कोविशिल्ड लसीचा डोस घेतला. यावेळी मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे, राजश्री जाधव, प्रमिला शिगोरे, सुजाता मठपती, प्रियंका कुंभार, अप्पू जाधव या आरोग्य कर्मचाऱ्यांसह पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, लसीकरण पथक प्रमुख विक्रम देवकर, गौरव वडे, देविदास मुरुमकर, अशोक राठोड, गौतम गायकवाड, प्रशांत सुरवसे, अरविंद पवार आदी उपस्थित होते.
कोट............
लसीकरणाच्या बाबतीत शहरात जनजागृती करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांना याबाबत पत्रदेखील पाठविण्यात आले होते. चार दिवसात केवळ १४१ नागरिकांनीच कोविशिल्ड लस टोचून घेतली. कोविशिल्ड लस घेतल्याने नागरिक आजारी पडत असल्याची अफवा आहे. सुरुवातीला लस घेतल्यानंतर एक ते दोन दिवस अंग दुखते, ताप येते. त्यामुळे ही लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येतात. ही लस घेतल्यानंतर कोणताही इतर त्रास होत नसल्याचा नागरिकांना अनुभव आहे. त्यामुळे कोविशिल्ड लस घेण्यासाठी बहुतांश शहरवासीयांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. शहरातील ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत पाच हजार जणांनी लसीकरण करून घेतले आहे.
- हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी