शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी संसर्ग मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या अँटिजन चाचणीत शहरातील यशवंतनगर भागात तबल्ल ७ तर शास्त्रीनगर, संभाजीनगर, नेहरूनगर, महादेवनगर येथे प्रत्येकी एक, केसरजवळगा व दाळिंब येथील प्रत्येकी एक अशा एकूण १३ नव्या रुग्णांची सोमवारी भर पडली. दुसऱ्या लाटेत शहरातील बाधितांची संख्या १०६ वर पोहोचली असून, या आजाराने आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे.
राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास जिल्हाबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवेला सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे; परंतु या काळातच शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडून नियमांची पायपल्ली करीत आहेत. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असली तरी नागरिकांची बेफिकिरी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील कोविड रुग्णालयात सध्या ४६ जणांवर उपचार सुरू असून, उपचारानंतर बरे झालेल्या ३ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.