उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. तर दुसरीकडे मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रशासनाकडून विश्लेषण करण्यात आले असता, धक्कादायक बाब समाेर आली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७२ तासांत मृत्यू हाेत आहे. अशा प्रकारे मत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास साेडला हाेता. सर्वकाही सुरळीत हाेत असतानाच काेराेची दुसरी लाट येऊन धडकली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. दिवसाकाठी पाचशे ते सहाशे रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही १५ ते २० एवढी आहे. मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. काेराेना झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. दगावलेल्या रुग्णांचे प्रशासनाकडून विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक रुग्ण काेराेनाची लक्षणे आढळून आली तरी चाचणी न करता आजार अंगावर काढत आहेत. परिणामी, संबंधित रुग्ण उशिराने दवाखान्यात दाखल हाेत आहेत. हा प्रकार तातडीने थांबला जावा, यासाठी आता जिल्हा प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही माेहीम शहरी तसेच ग्रामीण भागात हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये स्थानिक प्रशासनाच्या अधीनस्त असलेल्या यत्रणांनी तातडीने आरोग्य सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
चाैकट...
प्रामुख्याने मधुमेही, उच्च रक्तदाब, कॅन्सर या सारख्या दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन ज्या व्यकींची ऑक्सिजन पातळी ९२ पेक्षा कमी आहे व त्यांना ताप, सर्दी, कोरडा खोकला, डोके दुखणे आदी लक्षणे असतील तर त्यांची तातडीने काेराेना टेस्ट करून घ्यावी. या चाचणीत जी व्यक्ती पॉझिटिव्ह येईल तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची कार्यवाही करावी, असेही या आदेशात जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी नमूद केले आहे.