उस्मानाबाद : जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या गुढ आवाजाचे रहस्य अखेर उलगडले आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या भूवैज्ञानिक संस्थेकडे याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार सदर संस्थेकडून अहवाल प्राप्त झाला असून, भूजल पातळी खालावल्यानेच हे गुढ आवाज होत असल्याचा निष्कर्ष या विभागाने काढला आहे. १९९३ सालच्या महाप्रलंयकारी भूकंपानंतर जिल्ह्यात अलिकडे गुढ आवाजांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: कळंब, वाशी, परंडा तालुक्यात गुढ आवाजांच्या घटना घडत असल्याने नागरिकांत घबराट पसरली होती. त्या अनुषंगाने तत्कालिन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी गुढ आवाजामागचे कारण शोधून काढण्यासाठी नागपूरच्या भूवैज्ञानिक संस्थेकडे पाठपुरावा केला होता. नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक संस्थेचे वि. व. साखरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील गुढ आवाजाच्या अनुषंगाने अभ्यास केला असून, गुढ आवाजाचे रहस्य अखेर उलगडले आहे. भूजल पातळी खालावल्यानेच जमिनीतून गुढ आवाज होत असल्याचे साखरे यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. अहवालानुसार जिल्ह्यात होणारा गुढ आवाज हा भूगर्भाखालील बेसॉल्ट खडकामधील रेड बोल बेडस पाण्यामध्ये भिजल्यानंतर तो फुगतो परंतू जेव्हा अति पाण्याचा भूजल मधून उपसा झाल्यामुळे तो कोरडा होताच रेड बोल बेडसची जाडी कमी होेते. त्यामुळे पोकळी तयार होवून त्याच्या वरती असणाऱ्या भू - स्तरीय दाबामुळे स्थानिक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे जमिनीतून आवाज येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. नागपूर येथील अधीक्षक भूवैज्ञानिक विशाल साखरे, वरिष्ठ सहाय्यक रोहित कुवत यांनी सप्टेंबर २०१३ च्या पहिल्या आठवडयात भूम, परंडा व उस्मानाबाद येथील काही गावांना भेटी देवून याबाबतचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व हा पट्टा भूंकप क्षेत्रात असल्याचे अहवालत म्हटंले आहे. २२ मे २०१३ रोजी उस्मानाबाद येथे यो गुड आवाज झाला होता तो भूकंप असल्याची नोंद लातूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली होती. तो भूकंप २.४ मॅग्नेटीक या तीव्रतेचा होता. (प्रतिनिधी)भूवैज्ञानिक संस्थेने जिल्हा प्रशासनाला गुढ आवाजाच्या रहस्याबाबत दिलेल्या अहवालात भूजल पातळी खालावल्याने जमिनीतून आवाज येत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भूजल पातळी अशीच खालावत गेल्यास जिल्हावासियांना गंभीर परिणामाला सामोरे जावे लागण्याची भीतीही व्यक्त केली जात असून, सध्या गूढ आवाज होत आहेत. भूजल पातळी अशीच खालावत गेल्यास जिल्ह्यात भूकंप होण्याची शक्यताही असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
गुढ आवाज भूजल पातळी खालावल्यानेच
By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST