लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक १३ मध्ये आजवर ना रस्त्याचे काम झाले, ना नाल्याचे. यामुळे पावसाळ्यात येथील रस्ते चिखलमय होतात. यामुळे नागरिकांना घराकडे ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही भागात विद्युत खांबांचीही वानवा दिसून येते.
शहरातील प्रभाग क्रमाक १३ हा सर्वांत लहान प्रभाग असून, यामध्ये बाराईमान मोहल्ला, मज्जिद, माणिक नगर, कृष्णात कदम प्लॉटिंग आदी भाग येतो. उत्तरेस समीर कोनाळे कॉम्प्लेक्स ते निलू जाधव घर, पूर्वेस निलू जाधव घर, उमाकांत लांडगे घर ते सर्व्हे नंबर १४९, दक्षिणेस सर्व्हे नंबर १४९ ते सर्व्हे नंबर १४२, पश्चिमेस सर्व्हे नंबर १४२ ते समीर कोनाळे कॉम्प्लेक्स अशी या प्रभागाची रचना आहे. या प्रभागातील दोन प्रमुख रस्त्यावर पूल करण्यात आले असून, बाराईमान मोहल्ला येथे कच्चा रस्ता करण्यात आला आहे. तसेच बाराईमान मोहल्ला भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाच-सहा महिन्यांपूर्वीच शादी खानाजवळील बोअरपासून मलंग बंबईवाले यांच्या घरापर्यंत नागरिकांच्याच पुढाकारातून पाईपलाईन झाली. येथे दोन घरांसाठी एक नळ देण्यात आला आहे. त्यामुळे काहीअंशी या भागातील पाणीटंचाई दूर झाली आहे.
बाराईमान मोहल्ला येथे कच्चा रस्ता करण्यात आला असला तरी सिमेंट रस्ता, नाली होणे गरजेचे आहे. तसेच कृष्णात कदम दुकान ते रमेश वाघोले प्लॉटपर्यंत, माणिकनगर, कुंभार, जंगी, राठोड, शेख घर या भागात आतापर्यंत ना साधे कच्चेही रस्ते झाले, ना नाल्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे नेमका रस्ता कुठे आहे, याचाही अंदाज नागरिकांना येत नाही. तसेच जंगी, शेख, गोसावी यांच्या घराकडे रस्ता, नाली याबरोबरच विजेच्या खांबांचीही वानवा दिसून येते. जवळपास विद्युत खांब नसल्यामुळे येथील रहिवाशांना लांब असलेल्या खांबावरून विजेचे कनेक्शन घ्यावे लागत आहे.
कोट....
प्रभाग क्रमाक १३ मध्ये रस्ते, नाल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आम्हाला त्रास सहन करावा लागतो. अनेकदा घराकडे जाताना चप्पल हातात घेऊन चिखलातून वाट काढावी लागते. तसेच कदम प्लॉटिंगमध्ये विजेचे खांब नाहीत. त्यामुळे या भागात रस्ते, नाली यासोबतच विद्युत खांब उभारण्याचीही गरज आहे.
- गौस जंगी, रहिवासी
या प्रभागात काही कामे झाली असली तरी अपेक्षित कामे झाली नाहीत. आपसातील मतभेदामुळे जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. अल्पसंख्याकांसाठी आलेला निधी सत्ताधाऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे परत गेला आहे. प्रभागात विकासकामे झाली नाहीत, याला केवळ सत्ताधारीच जबाबदार आहेत.
- आयुब शेख, रहिवासी
प्रभाग क्रमाक १३ मधील अल्पसंख्याकांसाठी २० लाख रुपयांचा निधी आला होता. तो सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे परत गेला. त्यामुळे या प्रभागात विकासकामे होऊ शकली नाहीत. याला सर्वस्वी हे सत्ताधारीच जबाबदार आहेत.
- आबुलवफा कादरी, नगरसेवक
फोटो - लोहारा शहरातील प्रभाग क्रमाक १३ मध्ये कृष्णात कदम दुकान ते रमेश वाघोले प्लॉटपर्यंत रस्त्याची अशी परिस्थिती अशी आहे.