गटनेता निवड - एका ‘बप्पां’ना हटविले, दुसरे ‘बप्पा’ आणले
उस्मानाबाद - राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या उस्मानाबाद पालिकेतील नगरसेवकांची साेमवारी बैठक घेऊन गटनेता पदावरून युवराज नळे (बप्पा) यांना हटवून गणेश खाेचरे (बप्पा) यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला १६ पैकी नऊ सदस्य हजर हाेते. त्यामळे आता राष्ट्रवादी काॅंग्रेस ॲक्शन माेडमध्ये आल्याचे चित्र आहे.
उस्मानाबाद पालिकेत घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १६ एवढी आहे. परंतु, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ साेडत भाजपाचा भगवा झेंडा हाती घेतला. त्यामुळे घड्याळाच्या चिन्हावर निवडूनल आलेल्या सदस्यांत आमदार पाटील समर्थक व पवार प्रेमी असे दाेन गट पडले. उपाध्यक्ष निवडीवेळी आ. पाटील समर्थक युवराज नळे यांच्या नेतृत्वाखाली गट स्थापन करून गटनेतेपदी निवड केली हाेती. पालिकेची निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठपेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसही ॲक्शन माेडमध्ये आली आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पालिकेतील घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांची बैठक २८ डिसेंबर राेजी पक्षाच्या कार्यालयात बाेलावली हाेती. यावेळी १६ पैकी ९ सदस्य तसेच एक स्वीकृत नगरसेवक असे दहाजण उपस्थित हाेते. यावेळी नूतन गटनेता निवडीच्या अनुषंगाने चर्चा झाली असता, या पदावरून युवराज नळे यांना हटविण्याचे सर्वानुमते ठरले. यानंतर नवीन गटनेता निवडीच्या मते जाणून घेतली असता, सर्वानुमते गणेश खाेचरे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या हस्ते खाेचरे यांचा सत्कार करण्यात आला.
चाैकट...
बैठकीचा अधिकार गटनेत्यालाच...
उस्मानाबाद पालिकेतील नगरसेवकांची बैठक बाेलावण्याचा अधिकार हा गटनेत्यालाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात साेमवारी घेतलेली बैठक कायदेशीर नाही. त्यामुळे नूतन गटनेत्याची निवडही कायदेशीर ठरू शकत नाही. या घडामाेडीच्या अनुषंगाने आपण कायदेशीर सल्ला घेणार आहाेत. यानंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाईल, असे गटनेता युवराज नळे यांनी ’लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
नगरसेवकांची बैठक नियमानुसारच....
उस्मानाबाद पालिकेतील घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बाेलावलेली बैठक नियमानुसारच आहे. या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य हजर हाेते. उपस्थितांपैकी सर्वानुमते नूतन गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया नियमाला धरूनच आहे, असा दावा नूतन गटनेते गणेश खाेचरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केला.
बैठकीला हे सदस्य हाेते हजर...
नगरसेविका शेख फिरोज रुस्तम शेख, रशिदा बाबा शेख, पेठे विठाबाई भीमराव, वंदना अमित शिंदे, राजकन्या पोपट अडसूळ, नगरसेवक खलिफा कुरेशी, प्रदीप मुंडे, प्रदीप घोणे, गणेश खाेचरे, बाबा मुजावर, इस्माईल शेख, अशोक पेठे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष कादर खान, रणवीर इंगळे, अनवर शेख, बिलाल तांबोळी, इस्माईल काझी, मन्नान काझी, इम्रान पठाण, चंदन जाधव, गणेश देशमुख आदी उपस्थित हाेते.