उस्मानाबाद : डिझेलची सातत्याने दरवाढ सुरू असल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. आधीच व्यवसायात झालेली घट आणि त्यात ही दरवाढ, अशा दोन्ही बाजूंनी कोंडी होत असल्याचा दावा करीत सोमवारी मोटार मालक रस्त्यावर उतरले. काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत त्यांनी प्रशासनामार्फत शासनाला दर कमी करण्याबाबत सोमवारी साकडे घातले. उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघाने याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधले आहे. कोरोनाकाळात डिझेलवरील कररूपाने जमा होणारा महसूल उभारणीत निश्चित उपयुक्त ठरेल. मात्र, मालवाहतूक व्यवसाय हा पूर्णपणे मागणी व पुरवठा या तत्त्वावर चालतो. २०१९ पासून व्यापार, उद्योग कमी-अधिक प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे व्यवसायात ४० ते ५० टक्के घट झाली आहे. त्यातच डिझेल दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे व्यवसाय करणे अत्यंत अवघड झालेले आहे. तसेच व्यवसाय नसल्यामुळे देणी वाहतूकदारांकडे थकली आहेत. परिणामी, अनेक वाहने फायनान्स कंपनीने ओढून नेली आहेत. याअनुषंगाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी मोटार मालकांनी दंडावर काळ्या फिती बांधून दरवाढीचा निषेध नोंदविला. यापुढे अशीच दरवाढ सुरू राहिली किंवा दरात योग्य घट न झाल्यास ऑगस्टमध्ये आपली वाहने आहेत त्या ठिकाणी बेमुदत थांबविण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी अध्यक्ष मैनोद्दीन पठाण, आयुब शेख, अल्ताफ सय्यद, हबीब शेख, सलीम पठाण, जमीर पठाण, सालेर पठाण, दीपक जाधव, सुनील शेळके, महेबुब शेख, वाहेद शेख, जावेद पठाण, करीम शेख, युनूस पठाण, जमाल तांबोळी, सचिन लोखंडे, किरण ढोणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डिझेल दरवाढीविरुद्ध मोटार मालक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST