आनुवांशिकता हे लहान मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन असण्याचं प्रमुख कारण आहे. तसेच फॅटी फूडचं अधिक सेवन, शारीरिक हालचाली कमी करणं, पोषक तत्त्व असलेला आहार कमी घेणं यानेही लहान मुलांचे वजन वाढते. अशात मुलांचे वजन कमी ठेवण्यासाठी पालकांनी शक्य ते प्रयत्न केले पाहिजे. पौष्टिक आहार घेण्यासाठी लहान मुलांना प्रोत्साहित करा. नवनवे पौष्टिक पदार्थ त्यांना करून दिल्यास त्यांचा खाण्याचा उत्साह वाढू शकतो. पौष्टिक आहार आणि जंक फूड यांच्यात फरक काय आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यासोबतच चॉकलेट, आइस्क्रीमसारखे नरम पदार्थही त्यांना कमीच द्यावे. दिवसातून कमीत कमी एकदा आपल्या मुलांसोबत जेवण नक्की करा. जेव्हा लहान मुले आपल्या पालकांसोबत जेवायला बसतात, तेव्हा ते अधिक फळे आणि भाज्या खातात. जास्त फळे आणि भाज्या खाल्ल्यास वजन वाढण्याची समस्या कमी होते.
वजन वाढले कारण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने मुलांचे चालणे बंद आहे.
लॉकडाऊनमुळे मैदानी खेळ, पाळणे, सायकलिंग, निसर्ग भेटी, सहली बंद आहेत.
दिवसभर घरात बसून फास्ट फूड व टीव्ही पाहत जेवणे यामुळे वजन वाढले आहे.
जास्त खाणे व व्यायामाच्या अभावामुळे बालकांचे वजन वाढत आहे.
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
बालकांचे वजन वाढू नये यासाठी सकस आहार, पॅकेजिंग व फास्ट फूड टाळावे. तसेच चांगल्या आहाराची सवय ठेवावी.
दररोज चालणे, इनडोअर सायकलिंग, टेबल टेनिस, दोरी उड्या, घरच्या पायऱ्या चढणे उतरणे, योगासने, सूर्यनमस्कार करावेत.
अधिक कॅलरीज टाळावेत, टीव्ही पाहत जेवण करू नये. जास्त फळे आणि भाज्या खाल्ल्यास वजन वाढण्याची समस्या कमी होते.
काेट...
मोबाईल, टीव्हीच्या सवयीने मुलांना मैदानी खेळ किंवा गल्लीतच इतर खेळ जसे शिवणापाणी, विट्टी दांडू, गोट्या आदी पारंपरिक खेळं बंद झाले किंवा विस्मरणातच गेले म्हणलं तर वावगे होणार नाही. मागील दीड वर्षांपासून यात अधिक भर पडली, ती म्हणजे कोविड-१९ जागतिक महामारी व त्याअनुषंगाने लॉकडाऊन व सक्तीचे विलगीकरण. यामुळे लहान मुलांचे मैदानी खेळ व शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणात मंदावल्या. ही बाब या महामारीचे सर्वात मोठे नुकसान करणारी ठरतेय.
- प्रा. अभयकुमार हिरास, पालक, उमरगा.
--------------------------------------------
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर होणारी मुलांची कसरत बंद झाली आहे. मुले घरात कोंडून राहिल्याने जेवण करणे व झोपणे अशी दिनचर्या झाली असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. त्यांच्यासाठी शारीरिक हालचाल ही फार महत्त्वाची असते. धावणे, उड्या मारणे, फुटबॉल आणि स्विमिंग बंद झाल्याने मुलांचे वजन वाढत आहे.
- मन्मथ माळी, पालक, उमरगा.
लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात....
बालकांचे वजन वाढू नये यासाठी सकस आहार, पॅकेजिंग व फास्ट फूड टाळणे, चालणे, इंडोअर सायकलिंग, टेबल टेनिस, दोरीवरील उड्या, घरच्या पायऱ्या चढणे-उतरणे, योगासने, सूर्यनमस्कार करावेत. यामुळे शारीरिक व्यायाम होईल व वजन वाढणार नाही. टीव्ही पहात जेवण करू नये.
- डॉ. डी. एस. थिटे, बालरोगतज्ज्ञ, उमरगा.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने मुलांची हालचाल कमी झाली. ऑनलाईन शिक्षणामुळे सतत मोबाईल व टीव्ही पाहण्याने मेंदूवर तणाव येतो. यामुळे झोप कमी होते. फॅटी फूडचे अधिक सेवन, पोषण तत्त्व असलेला आहार कमी घेणे यानेही लहान मुलांचे वजन वाढते. अशात मुलांचे वजन कमी ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना पौष्टिक आहार, खेळ, सायकलिंग अशा व्यायाम होईल अशा गोष्टी करून घ्याव्यात.
- डॉ. प्रशांत मोरे, बालरोगतज्ज्ञ, उमरगा.