पांडुरंग पोळे
(फोटो : पांडुरंग पोळे १६)
नळदुर्ग : नळदुर्ग ते अक्कलकोट या महामार्गाचे काम मागील सहा वर्षांतही पूर्ण होऊ शकले नाही. बहुतांश ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे या महामार्गाला सध्या ग्रामीण रस्त्याची कळा आली असून, वाहनधारकांना मोठी कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत.
तुळजापूर- अक्कलकोट या धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी शासनाने हा राज्य मार्ग (काही गावाच्या शिवारात हा मार्ग जिल्हा व गाव रस्ता आहे) महामार्ग म्हणून घोषित करून आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा ठेका एका कंत्राटदारास देण्यात आला आहे. ठेकेदाराने काम सुरू केल्यापासून काही शेतकऱ्यांनी हरकती नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय, जिल्हा प्रशासनही याबाबत कुठलीच ठाम भूमिका घेत नसल्याने या महामार्गाचे काम आजपर्यंत खोळंबलेले आहे. जिथे शेतकऱ्यांच्या हरकती नाहीत त्या ठिकाणी ठेकेदाराने रस्ता खोदून भराव टाकून रूंदीकरण केलेले आहे. मात्र, जेथे काम अडवण्यात आले आहे, तिथे मार्ग खोदून टाकलेला किंवा अर्धवट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक समस्यांना वाहन चालक व परिसरातील नागरिक तोंड देत आहेत.
दरम्यान, या परिसरात मागच्या दोन - चार दिवसांत चांगला पाऊस झाला असल्याने आहे तो रस्ताही जागोजागी खराब झाला आहे. ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले, तेथील साईडपट्टीचे मजबुतीकरण करून दबाई करण्यात आली नाही. त्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक होत आहे. समोरून एखादे अवजड वाहन आल्यास दुसरे वाहन रस्त्याच्या खाली घेता येत नाही. घेतलेच तर ते रस्त्याच्या खाली उतरून अडकून पडत आहे. बुधवारी दुपारी देखील नळदुर्गवरून अक्कलकोटकडे जाणारा टेम्पो रस्त्यावरून खाली घसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाजूला काढून वाहतूक सुरळीत करावी लागली. याच वेळी एसटी महामंडळाची बस अडकून पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट...........
प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम चालू आहे. परंतु, काही शेतकऱ्यांनी मावेजासाठी काम अडविल्याने ते वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. वास्तविक भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार महामार्ग रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर अंतरापर्यंत कोणालाही परवानाधारक पक्के बांधकाम करता येत नाही की त्याचे अकृषी करून घेता येत नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केले किंवा जमीन अधिग्रहण करून चौपदरीकरण केले तरी या रस्त्याचे महामार्गात रूपांतर होते व कालांतराने त्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्व नियम लागू होतात. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन व भारतीय रस्ते विकास प्राधिकरण जाणून बुजून डोळेझाक करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.
- भीमाशंकर मिटकरी, स्थापत्य अभियंता