उस्मानाबाद : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाअंतर्गत ५० लाखांच्या विद्युतपंप खरेदीत अनियमितता झाल्याचे चाैकशीतून समाेर आले आहे. याच अहवालावरून साेमवारी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत प्रचंड गदाराेळ झाला. यानंतर प्रशासन ‘ॲक्शन’ माेडवर आले आहे. मंगळवारी तडकाफडकी सात अधिकाऱ्यांना सुनावणीसाठीच्या नाेटिसा काढण्यात आल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कारवाई हाेईल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून काही महिन्यांपूर्वी निविदाप्रक्रिया करून विद्युतपंप खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली हाेती. यासाठी सुमारे ५० लाखांची तरतूद हाेती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले हाेते. जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी विद्युतपंपांची मागणी केली नव्हती. ही मागणी नसताना जलव्यवस्थापन व स्थायी समितीची दिशाभूल करून मान्यता घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने थ्री फेजच्या २५ व सिंगल फेजच्या ४५ माेटारी खरेदीसाठी मंजुरी दिली हाेती. मात्र, प्रत्यक्षात २५ ऐवजी १२ थ्री फेज व उर्वरित सिंगल फेजच्या माेटारी खरेदी करण्यात आल्या आदी आरोप करण्यात आले हाेते. आराेपांतील गांभीर्य लक्षात घेऊन तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली हाेती. या समितीने दाेन ते अडीच महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला. अहवालाअंती खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे समाेर आल्यानंतर विराेध अधिक आक्रमक झाले आहेत. साेमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याच मुद्द्यावरून प्रचंड गदाराेळ झाला. कारवाईस विलंब केला जात असल्याचे आराेपही सत्ताधारी तसेच प्रशासनावर करण्यात आले हाेते. यानंतर मंगळवारी प्रशासन ‘ॲक्शन’ माेडवर आले. खरेदीप्रक्रिया तसेच बिल वितरणाशी संबंध आलेल्या जवळपास सात अधिकाऱ्यांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत. नाेटिसेनंतर त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीअंती जे काेणी दाेषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. या घडामाेडीमुळे अधिकाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.
चाैकट...
नावे ठेवली गुप्त...
विद्युतपंप खरेदी प्रकरण आता गंभीर वळणावर पाेहाेचले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या आदेशानंतर मंगळवारी सात अधिकाऱ्यांना नाेटिसा बजावण्यात आल्या. प्रस्तुत प्रतिनिधीने सूत्राकडे अधिकाऱ्यांच्या नावाबाबत विचारणा केली असता, ती सांगण्यास नकार दिला. केवळ संख्या सांगितली, हे विशेष. नावे गुप्त ठेवण्यामागचे इंगित काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
‘ताे’ पदाधिकारी काेण?
साेमवारी झालेल्या ऑनलाइन सभेत विद्युतपंप खरेदीतील अनियमिततेवरून गदाराेळ झाल्यानंतर प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. ‘अमुक’ पदाधिकाऱ्याच्या हटयाेगामुळे आपण नाहक अडचणीत आलाेत, अशी चर्चा काही अधिकाऱ्यांत सुरू हाेती. त्यामुळे ‘ताे’ पदाधिकारी काेण, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. पाणी आमच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर ‘त्या’ पदाधिकाऱ्यांची नावे सुनावणीत देऊ, असेही काही अधिकारी खासगीत सांगत आहेत.
काेट...
विद्युतपंप खरेदीच्या अनुषंगाने झालेल्या आराेपानंतर चाैकशी समिती नेमण्यात आली हाेती. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. अहवालाअंती प्रक्रियेशी ज्यांचा ज्यांचा संबंध आला आहे, त्यांना नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर त्यांची सुनावणी घेण्यात येईल. यानंतर जे काेणी दाेषी आढळून येतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
-डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद