कळंब : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील शिवप्रेमींनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची उंची वाढणार आहे. दुसऱ्या बाजूने कळंब-ढोकी या राज्यमार्गाचे काम झाल्याने त्या बाजूची रस्त्याची उंची वाढली आहे. रस्त्याची उंची वाढल्याने पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची कमी होणार आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा पुतळा शहराचे वैभव आहे. या पुतळ्याशी अनेकांच्या भावना जोडल्या असल्याने पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची कमी होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य होणार नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवावा तसेच पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी निवेदनात केली आहे.
निवेदनावर अमर चाऊस, अतुल गायकवाड, आबासाहेब फरताडे, बजरंग ताटे, मकरंद पाटील, शिवाजी गिड्डे, ॲड. डी. एस. पवार, संदीप बावीकर, श्रीकांत शेगदार, अजय पारवे, लहू अष्टेकर, विजय पारवे, शिवाई प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या सह्या आहेत.