उमरगा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाच्या नावाखाली तेरणा नदीपात्रातून मातीमिश्रीत वाळूचा बेकायदा उपसा सुरू असल्याचे समोर आल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.याबाबत माहिती अशी की, सध्या तालुक्यात ठिकठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण, खोलीकरण आदी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु, लोहारा तालुक्यातील सास्तूर गावापासून जाणाऱ्या तेरणा नदीपात्रातून जलयुक्त शिवार अभियानाच्या नावाखाली मातीमिश्रीत वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांना मिळाली होती. यावरून श्रींगी व त्यांच्या पथकाने मंगळवारी अचानक या ठिकाणी भेट दिली. यावेळी उपस्थितांनी हे ठिकाण लातूर जिल्हा हद्दीत असल्याचे श्रींगी यांना सांगितले. परंतु, चौकशीअंती हे ठिकाण लोहारा तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या ठिकाणाहून मातीमिश्रीत वाळूचा बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे समोर आले. यावरून श्रींगी यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठिविला असून, संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहेत. (वार्ताहर)
मातीमिश्रीत वाळूचा बेकायदा उपसा !
By admin | Updated: May 7, 2015 00:57 IST