धाेकादायक - ही बेजबाबदारी काय कामाची? उस्मानाबाद - काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी ताेंडावर मास्क तसेच ग्लाेज, सॅनिटायझर वापराचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार बहुतांश मंडळी आवाहनास प्रतिसादही देत आहेत; मात्र अशीच काही मंडळी स्वत: वापरलेले ग्लाेज तसेच मास्क चक्क जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच फेकून देताहेत. ही बेजबाबदारी तेथून ये-जा करणाऱ्यांसाठी धाेकादायक ठरू शकते. त्यामुळे वापरलेले मास्क, ग्लाेजची याेग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे.
जिल्ह्यात काेराेनाचा संसर्गत प्रचंड वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. एवढेच नाही तर ग्लाेज, सॅनिटायझरच्या वापरासह सार्वजनिक ठिकाणी वावरताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत आवाहन केले जात आहे. शासन आणि प्रशासनाच्या या आवाहनास प्रतिसाद देत बहुतांश जण मास्क, ग्लाेजचा नियमित वापर करू लागले आहेत; परंतु आपण सुरक्षित राहिलाे की बस्स. दुसऱ्यांचे काही का हाेईना, अशी वृत्ती अनेकांत बळावली आहे. म्हणूनच की काय, वापरलेलेे मास्क, ग्लाेज जिल्हा रुग्णालय इमारत परिसरात फेकून दिले जात आहेत. वापरलेले मास्क, ग्लाेजची याेग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, तसेच शासनाचे निर्देशही आहेत. असे असतानाही त्याकडे काही मंडळीकडून डाेळेझाक केली जात आहे. संबंधितांची ही बेजबाबदार वृत्ती इतरांसाठी धाेकादायक ठरू शकते.