४०२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०२ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई मंगळवारी १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील विविध मार्गावर करण्यात आली. या वाहनचालकांकडून १ लाख ४ हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून कळविण्यात आले.
म्हैस चोरीचा लावला छडा
उस्मानाबाद : कळंब शहरातून मागील वीस दिवसांपूर्वी म्हैस चोरीस गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हैस चोरीचा छडा लावत म्हैस ताब्यात घेतली आहे.
कळंब येथील जगन्नाथ भोरे यांच्या शेडमधून २० ते २१ जानेवारी रोजी म्हैस चोरीस गेली होती. या प्रकरणी भोरे यांनी कळंब पोलीस ठाण्यात म्हैस चोरीची फिर्याद दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हेरवाडी येथील नाना काळे यांच्या गोठ्यातून ताब्यात घेतली. म्हैस चोरट्याचा शोध कळंब ठाण्याचे पोलीस
घेत आहेत.
आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दाम्पत्यास मारहाण
उस्मानाबाद : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका व्यक्तीने दाम्पत्यास मारहाण केली. ही घटना जवळा (दु.) शिवारात ७ फेब्रुवारी रोजी घडली.
जवळा (दु.) येथील आप्पासाहेब गुळवे यांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून गावकरी गंगाधर गोडसे व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद गंगाधर गोडसे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिली. यावरून संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.