भूम (जि.उस्मानाबाद) : मुंबईची वारी करुन आलेल्या हिरकणी बसला भूमच्या आगारात पार्क केली असताना, मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. प्रयत्न करूनही आग आटोक्यात न आल्याने बस जळून खाक झाली असून, यात १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
भूम आगाराची मुंबई-भूम फेऱ्या करणारी बस मंगळवारी सकाळी ९ वाजता फेरी करून आली होती. ही बस आल्यानंतर आगारातील स्वच्छता विभागाने त्याची साफसफाई केली. नंतर डिझेल भरून आगारातीलच डिझेल पंपाजवळ असलेल्या जागेत बस पार्क करण्यात आली होती. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक या उभ्या बसला आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही क्षणात धुराचे लोट उठू लागले. दरम्यान, उपस्थित कर्मचाऱ्यांनी शेजारच्या सर्व बसेस प्रसंगावधान राखून आगाराबाहेर काढल्या. उपलब्ध असलेल्या अग्निशमन साहित्याने आग विझविण्यास सुरुवात केली. २० ते २५ फायर वापरूनही आग विझत नसल्याचे कर्मचारी गणेश वाघमारे यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागास तातडीने संपर्क केला. यानंतर, अवघ्या १० मिनिटांत अग्निशमन दलाचे वाहन आगारात दाखल झाले व आग विझविण्यात आली.
मोठा अनर्थ टळला...
जळालेल्या बसची डिझेल टाकी भरलेली होती, शिवाय ती आगारातील डिझेल पंपापासून अवघ्या काही फुटाच्या अंतरावर उभी करण्यात आली होती. वेळेत आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र, या घटनेत एसटीचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी वायरिंगमधील शॉर्टसर्किटने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे. उस्मानाबाद येथून एक पथक येऊन याची पाहणी करेल. नंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी सर्व बसेसची वायरिंग तपासून घेण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख खटाळ यांनी सांगितले.
060421\06osm_1_06042021_41.jpg
भूम (जि.उस्मानाबाद) येथील आगारात लावलेल्या बसला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना कर्मचारी.