उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात, पाय निकामी झाल्यास पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अशा साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले आहेत. याशिवाय २७ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेती करताना एखाद्या घरातील कर्त्या व्यक्तिच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून त्यांना अनेक अडचणीचा सामना करण्याची भीती असते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबास अर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते अशा कुटुंबांना मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अपघाताच्या ३५१ घटना घडल्या आहेत. सन २०११-१२ मध्ये १३० विविध घटना घडल्या आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातून ३४, तुळजापूर २०, उमरगा १४, लोहारा ०४, भूम १५, परंडा ०९, कळंब २३ तर वाशी तालुक्यातून ११ घटना घडल्या असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. १३० प्रस्ताव कृषी विभागाच्या वतीने विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले होते. यातील १०४ प्रस्तावांना विमा कंपनीने मंजूर देऊन संबधितांना रक्कम वाटप केली तर २५ जणांचे प्रस्ताव अमान्य , एक प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. २०१२-१३ मध्ये १५८ घटना घडल्या होत्या. यातील १०३ प्रस्ताव मंजूर तर ३८ नामंजूर तर ९ दावे कंपनीकडे प्रलंबित आहेत. यातील पाच दावे बंद करण्यात आले असून, ग्राहक मंचात तीन प्रकरणे दाखल आहेत. २०१३-१४ मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत ६३ घटना घडल्या होत्या. यातील ३८ प्रस्तावांना मंजूर करून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली तर आठ दावे नामंजूर करण्यात आले आहे तर १७ दावे विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तीन वर्षात जिल्ह्यात साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले तर २७ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. तसेच प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कागदपत्रांची पुर्तता केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत २४५ कुटुंबाना आधार
By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST